अजितदादांच्या मदतीची भाजपाला गरज, त्यामुळे...; भाजपा नेत्यांची RSS ला विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 10:53 IST2024-07-24T10:51:07+5:302024-07-24T10:53:50+5:30
गेल्या काही दिवसांपासून आरएसएसकडून अजित पवारांवर निशाणा साधण्यात येत आहे. त्यावरून भाजपा नेत्यांनी ही विनंती केली आहे.

अजितदादांच्या मदतीची भाजपाला गरज, त्यामुळे...; भाजपा नेत्यांची RSS ला विनंती
मुंबई - महाराष्ट्रात पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मविआ आणि महायुतीतील सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे परंतु एनडीएत सहभागी भाजपा, शिवसेना(शिंदे गट) आणि राष्ट्रवादी(अजित पवार गट) यांच्यात काही आलबेल नसल्याचं समोर यंत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेल्या फटक्यामुळे राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने अजित पवारांवर निशाणा साधत आहे. मात्र अजितदादांवर टीका करणं टाळा, अशी विनंती भाजपा नेत्यांनी आरएसएसला केली आहे.
अजित पवारांसोबत आघाडीमुळे भाजपाला फायदा होण्याऐवजी नुकसानच झालं असा दावा आरएसएस करत आहे. आरएसएसनं एका लेखात म्हटलंय की, लोकसभा निवडणुकीत भाजपाला चांगली कामगिरी करता आली नाही कारण त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी केली होती. TOI रिपोर्टनुसार, राष्ट्रवादीसोबत युतीमुळे भाजपाचा पारंपारिक मतदार दुखावला गेला आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांवर हल्ला करत संघ भाजपाला राष्ट्रवादीपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे असं तज्ज्ञ सांगतात.
भाजपा-आरएसएसच्या नेत्यांमध्ये बैठक
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपा आणि आरएसएसच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवारांच्या महायुतीतील सहभागावरही चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. अजित पवार हे महायुतीचे घटक असून विधानसभेला त्यांच्या मदतीची भाजपाला गरज आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं टाळावं अशी विनंती भाजपा नेत्यांनी आरएसएसला केली.
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं अवघ्या ४ जागा लढवल्या होत्या. त्यातील एकाच जागेवर राष्ट्रवादी उमेदवाराचा विजय झाला. शरद पवारांचा पक्ष फोडून पक्षाचं नाव आणि चिन्ह घेऊनही अजित पवारांच्या पदरी निराशा पडली. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना जोमाने विधानसभा निवडणुका लढण्याच्या सूचना दिल्यात. मात्र आरएसएसकडून अजित पवारांवर पराभवाचं खापर फोडण्यात येत असल्यानं कार्यकर्तेही नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीनं ४८ पैकी किमान ४० जागा जिंकण्याचा निश्चय केला होता परंतु फक्त १७ जागांवर महायुतीला समाधान मानावं लागलं.