५०० मधून १०० जागा, पास होत नाय..! मस्ती आलीय काय?; रॅपच्या माध्यमातून मविआवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 00:29 IST2024-08-09T00:28:23+5:302024-08-09T00:29:08+5:30
रॅपच्या माध्यमातून महायुतीचा महाविकास आघाडीवर निशाणा, भाजपा आमदाराकडून ट्विट करत रॅप व्हायरल

५०० मधून १०० जागा, पास होत नाय..! मस्ती आलीय काय?; रॅपच्या माध्यमातून मविआवर निशाणा
मुंबई - लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्हमुळे महायुतीला फटका झाला असा आरोप सातत्याने महायुतीकडूनमहाविकास आघाडीवर केला जात आहे. लोकसभेत राज्यात महाविकास आघाडीच्या ४८ पैकी ३१ जागा निवडून आल्या तर मिशन ४० प्लस रणनीतीवर काम करणाऱ्या महायुतीला अवघ्या १७ जागांवर समाधान मानावं लागलं. त्यानंतर आता महायुतीकडून विधानसभेत मविआला धोबीपछाड देण्यासाठी सर्वच प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहे. एका रॅपच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या रणनीतीवर टीका करण्यात येत आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी हे रॅप शेअर केले आहे.
या रॅपच्या माध्यमातून मविआच्या फेक नरेटिव्हवर भाष्य करण्यात आले आहे. खोटं बोलून मतं मिळाली म्हणून मस्ती आली काय असा सवाल या रॅपच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. हे रॅप साँन्ग सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी हे रॅप ट्विट करत एकदम कडक असं कौतुक केले आहे.
रॅपमध्ये नेमकं काय?
मस्ती आलीय काय.. असं म्हणत या रॅपमधून उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नाना पटोले, संजय राऊत, रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि विजय वडेट्टीवारांचा फोटो लावण्यात आला आहे. खोटं बोलून मतं मिळाली, मस्ती आली काय? महाराष्ट्राची जनता आता जागी झाली हाय...५०० मधून १०० जागा, पास होत नाय..१०-२० जागा वाढल्या म्हणून सत्ता येत नाय...अशा शब्दात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर खोचक टीका करण्यात आली आहे.
एकदम कडक 👇😅 pic.twitter.com/KmjxA8FdUa
— Nitesh Rane (@NiteshNRane) August 8, 2024
दरम्यान, विधानसभा निवडणुकीला आता काहीच महिने शिल्लक आहेत. त्यात सगळेच पक्ष आपापली रणनीती आखत आहेत. मविआला लोकसभेत मिळालेलं यश पाहून महायुतीनं विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेचा पहिला हफ्ता १७ ऑगस्टला दिला जाणार आहे. मात्र या योजनेवरून महायुती आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसून येते.