“बारामतीत सुप्रिया सुळेंना मत म्हणजे राहुल गांधींना मत”; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 15:26 IST2024-04-08T15:24:07+5:302024-04-08T15:26:46+5:30
Devendra Fadnavis News: सुनेत्रा पवार यांना दिलेले मत हे पंतप्रधान मोदींना दिलेले मत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

“बारामतीत सुप्रिया सुळेंना मत म्हणजे राहुल गांधींना मत”; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Devendra Fadnavis News: महायुतीत ज्या काही जागा आहेत, त्यांची एकत्रित घोषणा आम्ही करणार आहोत. प्रचाराला आता लागले पाहिजे. उमेदवार कुणीही असला तरी प्रचार कामी येतो. शिवसेना, राष्ट्रवादी यांसह मित्र पक्षांनी जिथे उमेदवार घोषित व्हायचे आहेत, तिथे तयारी केली पाहिजे, असे आम्ही ठरवले आहे. मेळावे घ्यावेत, असेही सांगितले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच बारामतीबाबत बोलताना सुप्रिया सुळेंवर टीका केली.
पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर थेट शब्दांत भाष्य केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत आहेत. एकनाथ खडसे भाजपामध्ये परतणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपामध्ये पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास ठेवून कुणीही प्रवेश करत असेल, तरीदेखील त्या ठिकाणी कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. पक्षाने आम्हाला याबाबत कळवले नाही. पण अधिकृतरित्या पक्ष आम्हाला कळवेल, तेव्हा त्यांचे आम्ही स्वागतच करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
बारामतीतसुप्रिया सुळेंना मत म्हणजे राहुल गांधींना मत
बारामतीबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझा शरद पवारांना सवाल आहे. शरद पवार हे बारामतीत उमेदवार नाहीत. सुनेत्रा पवार निवडून आल्या तर पंतप्रधान मोदींसाठी हात उंचावतील आणि सुप्रिया सुळे निवडून आल्या तर राहुल गांधींसाठी हात उंचावतील. म्हणजेच काय सुनेत्रा पवार यांना दिलेले मत हे पंतप्रधान मोदींना दिलेले मत आहे. सुप्रिया सुळेंना दिलेले मत हे राहुल गांधींना दिलेले मत आहे. हे काही लोकांना समजत नसेल तर आम्ही काय करणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मनसेशी काही चर्चा आमच्या गेल्या काही काळात झालेल्या आहेत. विशेषतः मनसेनी जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा घेतला, तेव्हापासून त्यांची आणि आमची एकप्रकारे जवळीक वाढली आहे. निश्चितपणे आमची अपेक्षा अशी आहे की, राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीसोबत राहील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.