भाजप-काँग्रेस नगरसेवकांचा घरोबा; आधी अभद्र युती, नंतर डॅमेज कंट्रोल, अखेर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 05:44 IST2026-01-08T05:42:07+5:302026-01-08T05:44:02+5:30
अंबरनाथमध्ये काँग्रेसचे १२ नगरसेवक, शहराध्यक्ष पक्षातून निलंबित, तर चौफेर टीकेनंतर अकोटमधली विकास आघाडी बारगळली, भाजपने आमदाराला बजावली ‘शो कॉज’ नोटीस

भाजप-काँग्रेस नगरसेवकांचा घरोबा; आधी अभद्र युती, नंतर डॅमेज कंट्रोल, अखेर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :अंबरनाथ (जि. ठाणे) नगरपरिषदेत भाजप-काँग्रेसची युती व अकोट (जि. अकोला) नगरपरिषदेत भाजप-एमआयएम-शिंदेसेना अशी अभद्र युती झाल्याची चौफेर टीका झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेसने आपल्याच पक्षजनांवर कारवाईचा बडगा उचलला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबरनाथमधील १२ नगरसेवक, तसेच शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांना पक्षातून निलंबित केले आणि शहर कार्यकारिणी बरखास्त केली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. अंबरनाथमध्ये शिंदेसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सोबत हातमिळवणी करीत ‘अंबरनाथ विकास आघाडी’ची स्थापना केली. अकोटमध्ये भाजप, एमआयएम, शिंदेसेना, उद्धवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती असे सगळे एकत्र आले आणि त्यांनी अकोट विकास मंचची जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी केली.
दोन्ही शहरांमध्ये नगराध्यक्ष भाजपचे निवडून आलेले आहेत; पण उपनगराध्यक्ष, विविध विषय समित्या आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत वर्चस्व राहावे यासाठी जोडतोडीचे राजकारण झाले.
आ. भारसाकळेंना बजावलेल्या नोटिशीत काय म्हटले?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांना पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिसीत कडक शब्दांत जाब विचारला आहे. एमआयएमसोबत युती करून आपण पक्षाच्या ध्येयधोरणांना सुरुंग लावला आहे. पक्षामध्ये कोणालाही विश्वासात न घेता आपण ही युती करून पक्षाची प्रतिमा मलिन केली आहे. आपल्यावर तातडीने कारवाई का करू नये याचा तत्काळ खुलासा करा, असे नोटिसीत म्हटले आहे.
भाजपचा अंबरनाथसाठी वेगळा न्याय : अंबरनाथमध्ये अशीच युती करणारे पदाधिकारी, नगरसेवक यांच्यावर कुठलीही कारवाई भाजपने रात्रीपर्यंत केलेली नव्हती. अंबरनाथमध्ये शिंदेसेनेचे २७, भाजपचे १४, काँग्रेसचे १२, राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे ४ व दोन अपक्ष असे ५९ नगरसेवक निवडून आले आहेत. सत्ता स्थापन करताना भाजपने शिंदेसेनेला डावलून अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली आहे.
अकोट विकास आघाडीत वरिष्ठांच्या हस्तक्षेपाने बिघाडी
अकोला : अकोट नगरपरिषदेत नगराध्यक्ष भाजपचा असताना बहुमत नसल्याने भाजपने एआयएमआयएमच्या पाच नगरसेवकांसह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, प्रहारचे मिळून २५ सदस्यांची मोट बांधली होती, मात्र, या आघाडीला सुरुंग लागला आहे. विकास आघाडीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी सकाळी दाखल झाला.
हा प्रकार माहिती होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही संस्थेत काँग्रेस, एआयएमआयएम या पक्षाशी युती होणार नसल्याचे स्पष्ट केले. एमआयएमचे नेते खा. असुदुद्दीन ओवैसी यांनीही नगरसेवकांना खडसावले. दुपारी घडलेल्या या घडामोडीने एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी अकोट विकास आघाडीत सहभाग नसल्याचे पत्र दिले.
स्थानिक पातळीवर काँग्रेस किंवा एमआयएमसोबत कोणतीही युती खपवून घेतली जाणार नाही. ही युती तत्त्वशून्य आहे आणि ती होऊच शकत नाही. अशी युती म्हणजे शिस्तभंगच आहे आणि ती तोडावीच लागेल. स्थानिक नेत्यांनी जरी हा निर्णय घेतला असला, तरी तो पूर्णपणे चुकीचा आहे. ज्यांनी कोणी ही युती घडवून आणली असेल, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
भाजपने अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि अकोटमध्ये एमआयएमशी युतीचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. - खा. श्रीकांत शिंदे, शिंदेसेना
एमआयएमचे नगरसेवक भाजपमध्ये आले असते, तर आघाडीला हरकत नव्हती. मात्र, नंतर त्यांनी आघाडीत सहभागी नसल्याचे पत्र दिले. ती आघाडी आता शिल्लक नाही. - अनुप धोत्रे, खासदार, अकोला
आम्ही काँग्रेसमध्ये होतो. मात्र, अन्यायामुळे आणि अंबरनाथच्या विकासासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. - प्रदीप पाटील, गटनेते, काँग्रेस, अंबरनाथ