Maharashtra Politics: शिंदे गटाला धक्का! मुख्यमंत्र्यांची पाठ फिरली, करेक्ट कार्यक्रम झाला; २१ जण ठाकरे गटात परतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 21:36 IST2022-12-15T21:35:45+5:302022-12-15T21:36:34+5:30
Maharashtra News: शिंदे गट दोन वर्षेही टिकणार नाही, लवकरच माती होईल, असा दावा करत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात घरवापसी केली.

Maharashtra Politics: शिंदे गटाला धक्का! मुख्यमंत्र्यांची पाठ फिरली, करेक्ट कार्यक्रम झाला; २१ जण ठाकरे गटात परतले
Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्यातील राजकारण अनेकविध मुद्द्यांमुळे तापल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्षही वाढताना दिसत आहे. एकीकडे राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा मिळत आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. मात्र, एका जिल्ह्यात शिंदे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे गटात परत आले आहेत. विशेष म्हणजे अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जिल्ह्यात दौरा केला होता.
बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे सोलापूर उपजिल्हाप्रमुख मनोज पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश करताना मनोज पवार यांनी शिंदे गटाच्या सोलापुरातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच अक्कलकोट तालुक्यातील या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. आता हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत परतले आहेत.
शिंदे गट हा दोन वर्षेही टिकणार नाही
शिंदे गटातून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यावर मनोज पवार यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख हे एकदम निष्क्रिय माणूस आहेत. आपली पोळी शेकून घेण्यासाठी हे लोक शिंदे गटात गेले आहेत. शिंदे गट हा दोन वर्षेही टिकणार नाही. यांची लवकरच माती होणार आहे, अशा शब्दांत मनोज पवार यांनी सोलापुरातील शिंदे गटावर घाणाघात केला. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिंदे गुरव समाजाच्या महाअधिवेशनासाठी सोलापुरात आले होते. ते जाताच जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील राजकारण फिरले आणि संपूर्ण गटाने धक्का देत पुन्हा उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला.
दरम्यान, शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख मनोज पवार यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. शिंदे गटासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्ते अशा एकूण २१ जणांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्यासह शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"