काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:38 IST2026-01-02T13:37:14+5:302026-01-02T13:38:13+5:30
Shiv Sena Shinde Group News: हे सगळे पक्ष प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
Shiv Sena Shinde Group News: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु, युती-आघाडीच्या निर्णयात झालेला उशीर, जागावाटपांचे अडलेले घोडे आणि हातातून निसटून चाललेली वेळ यामुळे संपूर्ण राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांमध्ये अभूतपूर्व गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले. यातच निष्ठावंतांना डावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने प्रचंड नाराजी पसरली आहे. बंडखोरीचे प्रमाणही वाढलेले पाहायला मिळत आहे. यातच ठाणे आणि नवी मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. ऐन निवडणुकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
नवी मुंबई महानगरपालिकेतील घणसोली विभागातील प्रथम नगरसेवक व सभापती दिवंगत दीपक दगडू पाटील यांच्या पत्नी व नगरसेविका शोभा दीपक पाटील तसेच त्यांचे पुत्र व नवी मुंबई युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासह पोलीस पाटील नरेश वसंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्षा आरती रोहिदास पाटील, उज्वला पाटील, सोनाली पाटील, रंजिता पाटील, ऋषिकेश पाटील, ऋतुराज पाटील आणि मल्हार पाटील यांनीही भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला.
आजवरचा राजकीय अनुभव पक्षासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल
ठाणे महापालिकेच्या माजी महापौर स्मिता इंदुलकर, त्यांचे पती व ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष इंदुलकर आणि त्यांचे पुत्र युवासेनेचे निशांत सुभाष इंदुलकर तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांचा आजवरचा राजकीय अनुभव पक्षासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
दरम्यान, शिवसेना भाजपा आणि रिपब्लिकन सेना महायुतीचे मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक ९३ चे उमेदवार सुमित वजाळे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील विविध पदाधिकाऱ्यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे मुंबई सचिव अजय जाधव, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष फकिरा उकांडे, तालुका अध्यक्ष विजय हिवाळे, स्वामी बनकर, दिलीप कांबळे यांचा समावेश होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष नितीन गायकवाड, युवक तालुका अध्यक्ष शिवम मेस्त्री, युवक वॉर्ड अध्यक्ष विकेश पवार, अक्षय कामतेकर, मयूर पवार, रितेश मोहिते, सुभाष चव्हाण आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हे सगळे पक्ष प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.