"चार जून नंतर करेक्ट कार्यक्रम करणार"; कपिल पाटलांचा भाजप आमदाराला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 06:47 PM2024-05-26T18:47:35+5:302024-05-26T18:53:33+5:30

Kapil Patil vs Kisan Kathore : केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि भाजप आमदार किसन कथोरे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आलाय.

Bhiwandi Lok Sabha After voting dispute between Kapil Patil and Kisan Kathore flared up | "चार जून नंतर करेक्ट कार्यक्रम करणार"; कपिल पाटलांचा भाजप आमदाराला इशारा

"चार जून नंतर करेक्ट कार्यक्रम करणार"; कपिल पाटलांचा भाजप आमदाराला इशारा

Bhiwandi Lok Sabha Election : महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं आहे. मात्र अद्यापही या निवडणुकीवरुन आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळतंय. भिवंडी लोकसभा मतदारसंघात सध्या भाजप खासदार आणि भाजपच्याच आमदारामध्ये वाद सुरु आहे. एका बैठकीनंतर बोलताना भिवंडीतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान थांबलेला वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात संघात भाजपकडून विद्यमान खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून सुरेश उर्फ बाळ्या म्हात्रे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे यांच्यात मुख्य लढत होती. मात्र आता कपिल पाटील यांनी आमदार कथोरेंवर नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी खुले पणाने तुतारीचे काम केल्याचे कपिल पाटील यांनी म्हटलं आहे.

शुक्रवारी मुरबाडमध्ये भाजपच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय मंत्री आणि भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील उपस्थित होते. यावेळी माध्यमांनी त्यांना भिवंडी लोकसभेत आपल्याला मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे हे मताधिक्य देतील असे आपल्याला वाटते का? असा सवाल केला. यावर बोलताना कपिल पाटील यांनी, "त्यांच्या मतदार संघातून कसे मताधिक्य मिळेल. त्यांच्या कार्यकर्त्यांनी खुले पणाने तुतारीचे काम केले आहे. काहींनी अपक्षाला मदत केली आहे. असा आरोप कथोरे यांचे नाव न घेता पाटील यांनी केला आहे. त्यांचे नाव घेवून त्यांना मोठे करायचे नाही," असं उत्तर दिलं.

तसेच लोकसभेला आपल्या विरोधात काम करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असा इशाराही कपिल पाटील यांनी दिला आहे. अजित पवार जसा करेक्ट कार्यक्रम करतात तसाच देवेंद्र फडणवीसही करत असतात. याचा अनुभव महाराष्ट्राने घेतला आहे असे कपिल पाटलांनी म्हटलं. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून कपिल पाटील आणि किसन कथोरे यांच्यातील वाद सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी टाटा कंपनीला वीज पुरवठा करण्याकरिता जागा देण्यावरून दोघांमध्ये जुंपली होती. बदलापूरकरांची भारनियमनातून मुक्तता करण्यासाठी कथोरे हे प्रयत्न करत असताना या प्रकल्पासाठी टाटाला मोफत जागा देऊ नका, अशी भूमिका खासदार कपिल पाटील यांनी घेतली होती. त्याआधीही श्रेय वादाची लढाई सुरु असताना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत किसन कथोरे उपस्थित नसताना कपिल पाटील यांनी एक आमदार दुसऱ्या मतदारसंघात निधी देऊ शकतो असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे गेल्य काही काळापासून हे दोन्ही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळतंय.

Web Title: Bhiwandi Lok Sabha After voting dispute between Kapil Patil and Kisan Kathore flared up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.