उमेदवारी मागे न घेण्यासाठी शिवतारेंना फोन केले?; अजितदादांच्या गंभीर आरोपांना 'पवार' स्टाइल उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 07:47 PM2024-04-15T19:47:38+5:302024-04-15T19:50:09+5:30

अजित पवारांच्या आरोपाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.

baramati lok sabha Pawar style reply to Ajit pawars serious allegations | उमेदवारी मागे न घेण्यासाठी शिवतारेंना फोन केले?; अजितदादांच्या गंभीर आरोपांना 'पवार' स्टाइल उत्तर

उमेदवारी मागे न घेण्यासाठी शिवतारेंना फोन केले?; अजितदादांच्या गंभीर आरोपांना 'पवार' स्टाइल उत्तर

Sharad Pawar ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघात रंगत असलेल्या हाय व्होल्टेज राजकीय सामन्यात आरोप-प्रत्यारोपांनाही ऊत आला आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी उमेदवारी मागे घेऊ नये, यासाठी काही लोकांनी रात्री-रात्री फोन केले, असा आरोप नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. या आरोपाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. "आम्ही एखाद्या व्यक्तीला प्रेमाने सांगितलं तर त्यात काय चुकीचं आहे?" असा मिश्किल सवाल पवार यांनी विचारला. पवारांच्या या वक्तव्यानंतर पत्रकार परिषदेत चांगलाच हशा पिकला.

विजय शिवतारेंना काही लोकांनी फोन केले, या अजित पवारांच्या आरोपावर तुमचं काय म्हणणं आहे? असा प्रश्न पत्रकारांकडून शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले की, "ठीक आहे, आम्हाला एखादा उमेदवार पाहिजेच असेल आणि त्याला जर आम्ही प्रेमाने सांगितलं तर त्यात काही चुकीचं आहे का?" अशा शब्दांत शरद पवारांनी आपली भूमिका मांडली.

अजित पवारांचा नेमका आरोप काय?

शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधताना अजित पवार यांनी म्हटलं होतं की, "लोकसभेची उमेदवारी मागे घेऊ नये म्हणून विजय शिवतारे यांना आलेले फोन त्यांनी मला दाखवले. ते फोन नंबर बघून मला इतकं वाईट वाटलं की कोणत्या पातळीवर राजकारण सुरू आहे. त्यांनी ते फोन नंबर मला दाखवले, एकनाथ शिंदेंना दाखवले  आणि देवेंद्र फडणवीसांनाही दाखवले. मी ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं, बाकी काही बघितलं नाही, त्यांच्याकडून माझ्या बाबतीत असं राजकारण सुरू आहे," असा आरोप अजित पवारांनी केला होता. 

दरम्यान, हे फोन नंबर नक्की कोणाचे होते, याबाबतचा प्रश्न पुण्यात अजित पवारांना दोन दिवसांपूर्वी विचारण्यात आला होता. या प्रश्नाने अजित पवारांचा पारा चांगलाच चढला आणि ते म्हणाले की, "तुम्ही मला मूर्ख समजू नका. मला जेवढं बोलायचं आहे, तेवढं मी सांगितलं आहे. घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे मला जेवढं बोलायचं आहे, तेवढं मी बोललो आहे," असं अजित पवारांनी म्हटलं होतं.

Web Title: baramati lok sabha Pawar style reply to Ajit pawars serious allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.