Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अॅसिड फेकलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:53 IST2025-11-08T18:50:38+5:302025-11-08T18:53:43+5:30
Acid Attack On Sister-in-Law: विधवा भावजयीने लग्नासाठी नकार दिला म्हणून तिच्यावर अॅसिड हल्ला केल्याची घटना उघडकीस आली.

Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अॅसिड फेकलं!
ग्वाल्हेर शहरात शुक्रवारी संध्याकाळी कंपू पोलीस स्टेशन परिसरातील अवदपुरा भागात एक अत्यंत संतापजनक घटना घडली. लग्नाला नकार दिल्यामुळे एका विधवेवर तिच्या जेठाने घरात घुसून अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीररित्या भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव मुशीर खान असे आहे. मुशीर खान याच्याही पत्नीचा मृत्यू झाला आहे. धाकट्या भावाच्या मृत्युनंतर मुशीर खान हा त्याच्या विधवा भावजयीच्या प्रेमात पडला. तिच्याशी लग्न करण्यासाठी तो तिच्यावर सतत दबाव आणत होता. पुतण्यांना भेटण्याच्या बहाण्याने मुशीर खान वारंवार पीडितेच्या घरी जायचा. परंतु, पीडितेने मुशीर खानच्या लग्नाच्या मागणीला स्पष्ट नकार दिला. यामुळे तो संतापला आणि त्याने पीडितेला जीवे मारण्याची योजना आखली.
दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी मुशीर खान अॅसिडची बाटली घेऊन पीडितेच्या पालकांच्या घरी पोहोचला. हल्ल्याच्या वेळी महिला आपल्या घरात भाजीपाला कापत होती. संतप्त मुशीर खानने घरात घुसून थेट तिच्यावर अॅसिड फेकले. या हल्ल्यात पीडितेचा चेहरा, छाती, हात आणि पाय गंभीरित्या भाजले. तिला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच कंपू पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी काल रात्री उशिरा मुशीर खानला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.