लातूरला मिळणार अनुसूचित जाती महिला प्रवर्गाची महापौर; काँग्रेसच्या 'या' तिघींमध्ये स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:33 IST2026-01-22T13:31:58+5:302026-01-22T13:33:16+5:30
कोण होणार लातूरची महापौर? काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग

लातूरला मिळणार अनुसूचित जाती महिला प्रवर्गाची महापौर; काँग्रेसच्या 'या' तिघींमध्ये स्पर्धा
लातूर: लातूर महानगरपालिका निवडणुकीत महिलांनी मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आता शहराच्या प्रथम नागरिक पदासाठी हालचालींना वेग आला आहे. यंदा ७० पैकी ३६ जागांवर महिलांनी विजय मिळवत महापालिकेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आरक्षणाप्रमाणे महापौरपद अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव असल्याने, काँग्रेसच्या गोटातून तीन नावे प्रामुख्याने चर्चेत आली आहेत.
शर्यतीत असलेली 'ती' तीन नावे:
महापालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक असल्याने महापौर पदी काँग्रेसचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने: १. मनीषा संभाजी बसपुरे (प्रभाग ३-अ) २. कांचन रत्नदीप अजनीकर (प्रभाग १०-अ) आणि ३. जयश्री भालचंद्र सोनकांबळे (प्रभाग १२-अ)
राजकीय गणिते आणि वर्चस्व:
लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे संख्याबळ पाहता, या निवडीत दोन्ही पक्षांचा समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे. अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून वंचितच्या अंकिता भडीकर आणि निकिता सोमवंशी यांनीही विजय मिळवला आहे, तर भाजपच्या करुणा शिंदे यांनीही चुरस निर्माण केली आहे. मात्र, सत्तास्थापनेच्या गणितात काँग्रेसचा महापौर होणे जवळपास निश्चित मानले जात आहे.
'स्त्री-शक्ती'चा बोलबाला
आता काँग्रेसच्या मनीषा बसपुरे, कांचन अजनीकर आणि जयश्री सोनकांबळे या तीन नावांपैकी वरिष्ठ पातळीवरून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. महापौर निवडीनंतर विषय समित्यांचे सभापती पदही महिलांच्याच वाट्याला जाण्याची शक्यता असल्याने लातूरच्या राजकारणात 'स्त्री-शक्ती'चा बोलबाला राहणार आहे.