लातुरात 'बॅग'वरून रणकंदन! काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले; मारहाण, पैसे वाटपाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 12:28 IST2026-01-12T12:25:05+5:302026-01-12T12:28:21+5:30
लातूर महापालिका निवडणुकीत रविवारी काँग्रेस उमेदवार-भाजप पदाधिकाऱ्यात प्रभाग १८ मध्ये बॅगवरून झटापट

लातुरात 'बॅग'वरून रणकंदन! काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले; मारहाण, पैसे वाटपाचा आरोप
लातूर : महापालिका निवडणुकीत प्रभाग १८ मध्ये रविवारी सकाळी काँग्रेस उमेदवार आणि भाजप पदाधिकाऱ्यांत बॅगच्या ओढाओढीत झटापट झाल्याची व्हिडीओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाली. रस्त्यावर घडलेल्या प्रकारात दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
या संदर्भात संजय गीर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅलीला जात असताना काँग्रेसचे उमेदवार सुंदर पाटील कव्हेकर व त्यांच्या समर्थकांनी माझ्या हातातील बॅग ओढून घेतली. बॅगमध्ये पैसे आहेत का, विचारत धक्काबुक्की केली. त्यांतील कागदपत्रे दाखवली तरी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शर्टचा खिसा फाडला; तसेच जिवे मारण्याची धमकी दिली; तर भाजप कार्यकर्ते राजकुमार शेटे यांनी तक्रारीत म्हटले आहे, मी घराजवळ थांबलो असता काँग्रेस उमेदवार सुंदर पाटील व कार्यकर्ते आले. त्यांनी मला धक्काबुक्की केली. ‘तू माझा प्रचार केलास, तर २५ हजार देतो,’ असे प्रलोभन दिले. त्यावेळी मी नकार दिला असता मला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सुंदर पाटील यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे, असेही शेटे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांत तक्रार दिली आहे : काँग्रेस उमेदवार सुंदर पाटील
काँग्रेस उमेदवार सुंदर पाटील कव्हेकर म्हणाले, ‘भाजप उमेदवारासाठी पैसे वाटले जात असल्याची माहिती मतदारांकडून मला मिळाली होती. तिथे जाऊन आम्ही थांबलो असता समोरून भाजपाचे संजय गीर हे बॅग घेऊन जात होते. त्यांना बॅगमध्ये पैसे आहेत का,’ असे विचारले. धक्काबुक्की किंवा मारहाण केलेली नाही. या उलट मतदारांना प्रलोभन देणे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याची तक्रार आम्हीही पोलिसांत दिली. व्हिडीओ क्लिप बघा सत्य कळेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, याबाबत सायंकाळपर्यंत गुन्ह्याची नोंद नव्हती.
मतदार धडा शिकवतील : अदिती पाटील-कव्हेकर
प्रभागातील भाजपच्या उमेदवार अदिती पाटील-कव्हेकर म्हणाल्या, ‘या गुंडगिरीला मतदार धडा शिकवतील. बॅगमधील कागदपत्रे दाखविली, तरी मारहाण केली. भाजपच्या कार्यकर्त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.’