Kolhapur: कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ, नृसिंहवाडीत दत्त मंदिर गेले पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:23 IST2025-07-28T19:21:55+5:302025-07-28T19:23:24+5:30
पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता

Kolhapur: कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ, नृसिंहवाडीत दत्त मंदिर गेले पाण्याखाली
नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात ८ फुटाने वाढ झाली आहे. परिणामी दत्त मंदिर निम्याहून अधिक पाण्याखाली गेले. कोयना, राधानगरी धरणातून विसर्ग सुरु असल्यामुळे शिरोळ तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरण पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग केल्याने कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. नृसिंहवाडीत गेल्या चोवीस तासात तब्बल ८ फुटाने पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे दत्त मंदिर निम्म्याहून अधिक पाण्याखाली गेले आहे. तर नदीच्या संगमावरील संगमेश्र्वर मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.
मंदिर पाण्याखाली गेल्याने श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी प.प.नारायण स्वामी महाराज यांचे मंदिरात ठेवण्यात आली असून तेथे त्रिकाळ पुजा चालू आहे. दरम्यान देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे काम सुरु केले आहे.
तसेच नदीकाठच्या शेतात नदीचे पाणी शिरत असल्याने शेतकरी नदीकाठची मोटर काढणे तसेच जनावरांसाठी चारा गोळा करण्यात गुंतले आहेत. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी न झाल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.