Ichalkaranji Mayor: इचलकरंजीचा महापौर अद्याप गुलदस्त्यात, आवाडे-हाळवणकर यांच्या गटबाजीत नावाची रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:02 IST2026-02-04T12:59:23+5:302026-02-04T13:02:30+5:30

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत आमदार राहुल आवाडे, प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर यांची आज बैठक होणार 

there is a tug-of war between the Awade and Halwankar factions over the nomination for the mayor post In Ichalkaranji | Ichalkaranji Mayor: इचलकरंजीचा महापौर अद्याप गुलदस्त्यात, आवाडे-हाळवणकर यांच्या गटबाजीत नावाची रस्सीखेच

Ichalkaranji Mayor: इचलकरंजीचा महापौर अद्याप गुलदस्त्यात, आवाडे-हाळवणकर यांच्या गटबाजीत नावाची रस्सीखेच

अतुल आंबी

इचलकरंजी : इचलकरंजीचा पहिला महापौर होण्याचा मान मिळविण्यासाठी इच्छुकांकडून पक्षश्रेष्ठींकडे सर्व बाजूने फिल्डींग लावण्याचे काम सुरू आहे. आवाडे-हाळवणकर यांच्यातील गटबाजी संपल्याचे सांगितले जात असले, तरी पडद्यामागच्या गटबाजीत रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच महापौरपदाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. पहिला महापौर कोण होणार, याबाबत शहरवासीयांतही मोठी उत्सुकता आहे, तर पक्षाकडून कोणाचे नाव जाहीर होणार, याबाबत इच्छुकांच्यात धाकधूक वाढली आहे.

येथील महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने बाजी मारत तब्बल ४३ जागा निवडून आणल्या आहेत. त्यामुळे पहिला महापौर भाजपचा होणार आहे. महापौरपदाचे ओबीसी आरक्षण पडले असल्याने त्यासाठी पात्र असलेल्या सर्वच ओबीसी उमेदवारांकडून पहिला महापौर म्हणून आपले नाव इतिहासात कायमस्वरूपी नोंदवले जावे, यासाठी जोरदार फिल्डींग सुरू आहे.

त्यातून कोणाला पहिल्यांदा संधी द्यावी? त्याचबरोबर एकूण किती जणांना महापौर आणि उपमहापौर संधी देता येईल, यावर पक्षश्रेष्ठींकडून नियोजन सुरू आहे. त्यानुसार पहिल्या बैठकीत १०-१० महिन्यांचा कालावधी ठरविण्यात आला. त्यानंतर वरिष्ठांकडून काही सूचना आल्याने पुन्हा सव्वा वर्षाचा करण्याबाबत नियोजन सुरू झाले आहे.

या सर्व घडामोडींमुळे निवडणूक होऊन १५ दिवसांचा कालावधी लोटला, तरी नाव निश्चित होईना. महापौर-उपमहापौर नाव निश्चित करण्याची जबाबदारी आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्याकडे देण्यात आली आहे. तिघांनी एकत्रित निर्णय घ्यावा, अशी वरिष्ठांकडून सूचना आहे. परंतु, त्यामध्ये कोणाला संधी द्यावी, यावरून दोन्ही गटांत रस्सीखेच सुरू आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये आवाडे-हाळवणकर असे गट राहिले नसून, फडणवीस यांचा एकच गट सर्वत्र असल्याचे सांगितले होते. परंतु, पडद्यामागच्या हालचालीचा वेग पाहता दोन्ही गटांकडून अंतर्गत रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येते.

एका गटाकडून धक्का तंत्र दिले जाईल. नवख्याला संधी दिली जाईल, असे जाहीरपणे सांगितले जात आहे, तर दुसऱ्या गटाकडून जुन्या जाणत्यांना प्राधान्य देऊन पहिल्या महानगरपालिकेची घडी बसविण्याबाबत बोलले जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात यात नेमकी कोणत्या वरिष्ठ नेत्याची मध्यस्थी होते, त्यावर बऱ्याच घडामोडी अवलंबून आहेत. त्यातून कोणता गट बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे.

उमेदवारी देतानाही झाली होती रस्सीखेच

भाजप मंडल अध्यक्ष निवडीवेळी आवाडे-हाळवणकर गटात रस्सीखेच झाली. त्यानंतर आवाडे गटाला २, हाळवणकर गटाला १ अध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर एका पदाच्या नावावरून पुन्हा वाद उत्पन्न झाला. त्यावर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मार्ग काढण्यात आला. असाच प्रकार महानगरपालिकेच्या उमेदवारी निवडीवेळी झाला. तो वाद मुंबईपर्यंत बैठका घेत थोपविण्यात आला.

आज महत्वपूर्ण बैठक

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत आमदार राहुल आवाडे, प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर यांची सांगली येथे बैठक होणार आहे. महापौर निवडीसंदर्भातील यांची एकत्रित ही पहिलीच बैठक आहे. यामध्ये दोन्ही गटांतील नावांवर चर्चा होणार असून, पहिल्याच बैठकीत नाव निश्चित होणार, की अजून काही बैठका घ्याव्या लागणार, याची उत्सुकता आहे.

Web Title : इचलकरंजी महापौर पद गुटबाजी के बीच अभी भी अनिश्चित

Web Summary : इचलकरंजी के पहले महापौर का पद गुटबाजी के कारण अभी भी अनिश्चित है। भाजपा ने बहुमत हासिल किया, लेकिन आवाडे और हलवणकर गुट पद के लिए प्रतिस्पर्धा कर रहे हैं। मंत्री पाटिल के साथ बैठक महत्वपूर्ण है।

Web Title : Ichalkaranji Mayor's Post Still Undecided Amid Factionalism

Web Summary : Ichalkaranji's first mayor remains undecided due to internal group rivalry. BJP secured majority, but Awade and Halvankar factions are vying for the position. Meeting with Minister Patil is crucial.