Kolhapur Deputy Mayor: एकच नगरसेवक, तरी जनसुराज्य शक्ती पक्षाला उपमहापौरपद; अक्षय जरग यांचे महत्त्व का वाढले?..वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:49 IST2026-02-03T13:49:01+5:302026-02-03T13:49:28+5:30
Akshay Jarg Kolhapur Deputy Mayor: शिवाय पाच वर्षे स्थायी समितीवर सदस्य केले जाणार

Kolhapur Deputy Mayor: एकच नगरसेवक, तरी जनसुराज्य शक्ती पक्षाला उपमहापौरपद; अक्षय जरग यांचे महत्त्व का वाढले?..वाचा
कोल्हापूर : जनसुराज्य शक्ती पक्षाचे एकच नगरसेवक आणि त्यांना पहिल्याच प्रयत्नात थेट मानाचे उपमहापौरपद मिळण्याची महापालिका इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. यामागे संख्याबळाचे मुख्य कारण असून, भविष्यात महायुतीला धोका निर्माण होऊ नये म्हणून ही संधी अक्षय जरग यांना देण्यात आली.
अक्षय जरग यांना काँग्रेस पक्षानेही ऑफर दिली होती, आमच्या पक्षाचे सहयोगी सदस्य व्हा, सलग पाच वर्षे आपणास स्थायी समितीवर सदस्य करतो, असे काँग्रेसकडून सांगण्यात आल्याची चर्चा आहे. परंतु, आधीच काठावरचे बहुमत आणि त्यात जरग यांनी काँग्रेससोबत जाणे आपल्याला धोक्याचे आहे हे ओळखून शिंदेसेनेने आपल्या कोट्यातून जरग यांना उपमहापौरपदाची उमेदवारी दिली. शिवाय पाच वर्षे स्थायी समितीवर सदस्य केले जाणार आहे.
जरग महायुतीत आले तर स्थायी समिती, परिवहन समिती, महिला बाल कल्याण समिती तसेच स्वीकृत सदस्यांच्या संख्येत महायुतीला अधिक स्थान मिळेल असे सांगितले जाते.
वाचा: कोल्हापुरात उपमहापौरपद उमेदवारीवरुन माजी आमदारांचे पुत्र झाले नाराज
सध्याच्या संख्याबळावर काँग्रेस, भाजप यांचे प्रत्येकी तीन, तर शिंदेसेनेचे दोन असे आठ स्वीकृत नगरसेवक होणार आहेत. जरग महायुतीचे सहयोगी सदस्य झाल्याने स्वीकृतची काँग्रेसची एक जागा कमी होऊन त्याचा लाभ महायुतीला होईल, असा दावा केला जात आहे. परंतु, एक सदस्याने कसलाही फरक पडणार नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.