Kolhapur Municipal Election 2026: उमेदवार घरोघरी प्रचारात; तर नेते उणीदुणी काढण्यात दंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 12:49 IST2026-01-07T12:47:27+5:302026-01-07T12:49:27+5:30
कार्यकर्त्यांची निवडणूक ; नेत्यांनी घेतली खांद्यावर

Kolhapur Municipal Election 2026: उमेदवार घरोघरी प्रचारात; तर नेते उणीदुणी काढण्यात दंग
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रचार आता शेवटच्या टप्प्याकडे झुकला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असताना विविध राजकीय पक्षातील नेत्यांनीच ती अंगाखांद्यावर घेतली आहे. एकीकडे उमेदवार, समर्थक घरोघरी प्रचार करण्यात गुंतले असताना नेते मंडळी मात्र उणीदुणी काढण्यात तसेच त्यावर खुलासे करण्यात व्यस्त आहेत.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक ही महायुती विरुद्ध काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यात होत आहे. उद्धवसेनेने काँग्रेसबरोबर आघाडी करताना केवळ सातच उमेदवार उभे केल्यामुळे निवडणुकीतील त्यांचा सहभाग फारच मर्यादित झाला आहे. त्यामुळे काँग्रेस, उद्धवसेनेच्या प्रचाराची, रणनीती आखण्याची सगळी जबाबदारी सतेज पाटील यांच्यावर आली आहे आणि त्यांनीही या निवडणुकीत महायुतीसमोर एक कडवे आव्हान उभे केले आहे.
वाचा : प्रचार करायचा की परवानग्याच घ्यायच्या; उमेदवार, समर्थक आले घायकुतीला
त्यामुळे स्वाभाविकच महायुतीकडून सतेज पाटील यांना लक्ष्य केले जाऊ लागले आहे. त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून ओळखला गेलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना ही आरोपांची केंद्रबिंदू ठरली आहे. या योजनेत ७० कोटींचा ढपला पाडला गेल्याचा आरोप काही वर्षापूर्वी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केला होता. या निवडणुकीत तोच आरोप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी करून हा मुद्दा केंद्रस्थानी आणला आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनीही या विषयावर थेट आरोप न करता हळुवार हात घातला आहे. पाटील यांच्याच पक्षाच्या आमदारांनी थेट पाईपलाईनमध्ये ढपला पाडल्याचा केलेल्या आरोपाकडे क्षीरसागर यांनी लक्ष वेधले आहे.
आमदार पाटील यांनी या आरोपाला उत्तर देताना थेट पाईपलाईन योजनेला कशा प्रकारे गालबोट लावण्याचे प्रयत्न केले हे प्रात्यक्षिकांसह मांडले. ३३ केव्हीचा खांब असलेल्या परिसरातील माती कोणी उपसली, एअर व्हॉल्वचे नटबोल्ट कोणी उचकटले, अशा प्रवृत्तींना कोणी पाठबळ दिले, चार एफआयआर दाखल होऊनही कारवाई का झाली नाही, असे प्रश्न उपस्थित करून विरोधकांवर संशयाची सुई उभी केली आहे. जर थेट पाईप लाईनमध्ये घोटाळा झाला असेल आणि ती निकृष्ट दर्जाची झाली असेल तर मग सत्तेत असूनही त्याची चौकशी का केली नाही, अशी थेट विचारणा आमदार पाटील यांनी विरोधकांना केली आहे.
दुसरीकडे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी शंभर कोटींचे रस्ते, गांधी मैदानाची दुरवस्था याबाबत आरोप केले आहेत. आमदार पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यातील जुना राजकीय वादही या निवडणुकीत उफाळून आला आहे. अजून पाच-सहा दिवस प्रचाराचे आहेत, त्यामुळे आणखी काही आराेपांनी निवडणूक गाजण्याची शक्यता आहे