LokSabha2024: मतांच्या धुव्रीकरणावरच विजयाचे गणित, हातकणंगलेत तिरंगी लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 12:37 PM2024-05-06T12:37:30+5:302024-05-06T12:37:30+5:30

विश्वास पाटील कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतांच्या धुव्रीकरणामध्येच विजयाचे गणित लपले आहे. सहा मतदारसंघांत जो चार लाखांचा आकडा ...

The calculation of victory is based on the polarization of votes in hand-to-hand contests, square in the three-way fight | LokSabha2024: मतांच्या धुव्रीकरणावरच विजयाचे गणित, हातकणंगलेत तिरंगी लढत

LokSabha2024: मतांच्या धुव्रीकरणावरच विजयाचे गणित, हातकणंगलेत तिरंगी लढत

विश्वास पाटील

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतांच्या धुव्रीकरणामध्येच विजयाचे गणित लपले आहे. सहा मतदारसंघांत जो चार लाखांचा आकडा पार करील तो विजयाच्या दिशेने वाटचाल करील असे चित्र आहे. कोल्हापूरप्रमाणेच या मतदारसंघातही महायुतीकडे नेत्यांची संख्या जास्त आहे. खासदार धैर्यशील माने यांच्या पाठीशी संघटनात्मक बळ, आर्थिक ताकद जास्त असली तरी ती प्रत्यक्षात मतापर्यंत किती पोहोचते हे महत्त्वाचे आहे. उद्धवसेनेचे सत्यजित पाटील यांच्याबद्दल नवीन उमेदवार म्हणून सहानुभूती आहे. राजू शेट्टी यांनाही शेतकऱ्यांसाठी राबणारा नेता म्हणून प्रतिसाद मिळत असल्याचा दावा ते करत आहेत.

या मतदारसंघात एकूण १८ लाख ११ हजार मतदान आहे. गेल्या निवडणुकीत ६७ टक्के मतदान झाले होते. यावर्षी उन्हाचा तडाखा जास्त आहे. त्यामुळे ते ६५ टक्के झाले तरी ११ लाख ७७ हजार मतदान होईल. एकूण २७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे वंचितसह इतर २४ उमेदवारांनी ७७ हजार मते घेतली, तर ११ लाख मते राहतात. त्यामध्ये तीन प्रमुख उमेदवारांचा विचार केल्यास ३ लाख ६६ मतांची विभागणी होते; परंतु सद्य:स्थितीत ही लढत दुरंगीकडे सरकली आहे. त्यामुळेच ४ लाखांची जो उमेदवार बेगमी करील तो विजयाचा दावेदार होऊ शकतो, असे चित्र आज दिसते.

  • गेल्या निवडणुकीत खासदार माने यांना मुख्यत: इचलकरंजी शहर, हातकणंगले आणि शाहूवाडी मतदारसंघाने चांगले मताधिक्य दिले. शेट्टी यांना शिराळा, वाळवा आणि शिरोळने मताधिक्य दिले. या निवडणुकीत या दोन्ही गृहितकांना धक्का बसला आहे.
  • या निवडणुकीत स्थानिक उमेदवार म्हणून शाहूवाडी मतदारसंघ पाठीशी राहील, शिवाय शिराळा-वाळव्यातही मताधिक्य घेऊ असे सत्यजित पाटील यांना वाटते. सत्यजित पाटील हे हातकणंगले, शिरोळ व इचलकरंजी मतदारसंघाला नवखे आहेत; परंतु ती त्यांची कमकुवत नव्हे तर आज जमेची बाजू ठरत आहे. नवीन उमेदवार असल्याचा लाभ त्यांना होत असल्याचे दिसत आहे.
  • शिरोळ व वाळवा मतदारसंघातील मताधिक्य आपल्याला विजयापर्यंत नेईल असे शेट्टी यांना वाटते. ओबीसी, मुस्लीम मतेही आपल्या पाठीशी राहतील, असा विश्वास त्यांना आहे. इचलकरंजीत पुरेशी स्पेस तयार करू शकलो नाही हे त्यांनाही मान्य आहे. तिथे ते काही वेगळे गणित मदतीला येईल असे प्रयत्न सुरू आहेत. शिरोळमध्ये गतवेळेपेक्षा स्थिती चांगली असल्याचा अनुभव त्यांना येत आहे.
  • इचलकरंजी शहरात आपल्याला मताधिक्य मिळेल असे खासदार माने यांना वाटते. तिथे भाजपचे केडर आहे. फक्त मोदी यांच्याकडे पाहून मतदान करणारा मतदार आहे. हातकणंगले मतदारसंघ हा त्यांच्या घरचा मतदारसंघ आहे. त्यामुळे हातकणंगलेसह शिरोळमध्येही आपल्याला चांगली मते मिळतील असे त्यांना वाटते. प्रत्यक्षात इचलकरंजी शहरात न सुटलेला पाणी प्रश्न कितपत उसळी घेतो, हे देखील महत्त्वाचे आहे.
  • या मतदारसंघातील सहापैकी तीन आमदार महाविकास आघाडीकडे आहेत. तीन महायुतीतील घटक पक्षांचे आहेत. भाजप व शिंदेसेनेचा स्वत:चा एकही आमदार नाही. आता विनय कोरे, प्रकाश आवाडे, राजेंद्र यड्रावकर हे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी माने यांना मत द्या, असा प्रचार करत आहेत; परंतु या तिन्ही आमदारांची मते कितपत माने यांच्या पदरात पडतात, हे निकाल ठरवणारे आहे.
  • गेल्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांनी घेतलेली सव्वालाख मते शेट्टी यांचा पराभव करून गेली. यावेळी वंचितचा फॅक्टर फारसा प्रभावी नाही; परंतु लढत मुख्य कोण दोघांत होते आणि तिसरा कुणाची किती मते घेतो, यावरच विजयाचे गणित अवलंबून राहील.
  • गेल्या निवडणुकीत मराठा मतांचे धुव्रीकरण माने यांना पहिल्याच प्रयत्नांत खासदार करून गेले. यावेळी ही मते कितपत विभागतात की कुण्या एकाच्याच पारड्यात जातात हा कळीचा मुद्दा आहे. सध्या तरी ती एकाच दिशेने एकवटत असल्याचे वातावरण दिसत आहे.

Web Title: The calculation of victory is based on the polarization of votes in hand-to-hand contests, square in the three-way fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.