Kolhapur Mayor: निकम ते निकम... कोल्हापुरात भाजपचा अनोखा प्रवास; कशी होती वाटचाल..वाचा सविस्तर
By समीर देशपांडे | Updated: February 7, 2026 12:29 IST2026-02-07T12:25:44+5:302026-02-07T12:29:35+5:30
‘वांगी बोळातील पक्ष’ म्हणून ज्या पक्षाची आणि कार्यकर्त्यांची चेष्टा केली जायची

Kolhapur Mayor: निकम ते निकम... कोल्हापुरात भाजपचा अनोखा प्रवास; कशी होती वाटचाल..वाचा सविस्तर
समीर देशपांडे
कोल्हापूर : ‘वांगी बोळातील पक्ष’ म्हणून ज्या पक्षाची आणि कार्यकर्त्यांची चेष्टा केली जायची, त्याच भाजपच्या रूपाराणी निकम या शुक्रवारी कोल्हापूरच्यामहापौर बनल्या. भाजप रुजवण्यासाठी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी केलेले कर्नल शंकरराव निकम ते रूपाराणी निकम या भाजपच्या प्रवासात महापौर पदामुळे परमोच्च बिंदू साधला गेला आहे. मात्र यासाठी ४० वर्षांचा काळ जावा लागला.
कोल्हापूर महापालिकेवर भाजपचे म्हणून ओळखले जाणारे सुभाष वोरा हे दोन वेळा निवडून आले. यानंतर १९९० साली आर. डी. पाटील कमळ चिन्हावर महापालिकेत निवडून आले. यानंतर १९९५ साली आर. डी. पाटील आणि नाना जरग निवडून आले. पाटील हे चार वेळा महापालिकेवर निवडून आले आणि त्यांनी स्थायी समितीचे सभापतीपदही भूषवले. पंचगंगा बँकेचे दिवंगत अध्यक्ष शरदचंद्र अष्टेकर यांच्या पत्नी अश्विनी अष्टेकर या देखील नगरसेविका होत्या. २०१४ नंतर भाजपची शहरात ताकद वाढत गेली आणि गेल्या निवडणुकीत १५ नगरसेवक निवडून आले.
परंतू तरीही कोल्हापूरमध्ये गेल्या अनेक वर्षात मधला तीन वेळचा अपवाद वगळता शिवसेनेचे उमेदवार आमदार म्हणून निवडून येत होते. त्यामुळे भाजपपेक्षा शिवसेनेचे प्रस्थ शहरात अधिक होते. परंतु आता भाजपनेही नियोजनबद्ध ताकद वाढवण्याचे धोरण ठेवले आणि महाडिक बंधू भाजपमध्ये आल्यापासून मूळ ताकदीमध्ये अधिकच भर पडली आणि भाजप शहरात विस्तारला.
भाजपने यावेळी महापालिकेसाठी बैठकांवर बैठका घेतल्या. जादा जागा घेतल्या आणि जादा निवडूनही आणल्या. याचाच परिणाम म्हणून आज भाजपच्या पहिल्या महापौर होण्याचा मान रूपाराणी निकम यांना मिळाला. कर्नल शंकरराव निकम, बाबा देसाई, ज. गो. कुलकर्णी, कृष्णराव सोळंकी, राजाराम शिपुगडे यांच्यासारख्या अनेकांनी भाजप रुजवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी परिश्रम घेतले.
चंद्रकांत पाटील यांच्यामुळे बळ
मंत्री चंद्रकांत पाटील हे दोन वेळा विधान परिषदेचे आमदार झाले. तेव्हापासून त्यांनी शहर आणि जिल्ह्यात भाजपचे जाळे विणायला सुरुवात केली. २०१४ ला ते मंत्री झाले आणि भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा सपाटा सुरू झाला. शहरातील आमदार आणि महापौर भाजपचा हवा यासाठी वाट्टेल तितके परिश्रम घेणाऱ्या पाटील यांचे स्वप्न साकार झाले.