Ichalkaranji Municipal Election 2026: भाजपच्या पहिल्या यादीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 17:16 IST2025-12-25T17:13:34+5:302025-12-25T17:16:39+5:30
सांगलीतील बैठकीत मतभेद

Ichalkaranji Municipal Election 2026: भाजपच्या पहिल्या यादीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार शिक्कामोर्तब
इचलकरंजी : महापालिका निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी शुक्रवारी (दि.२६) जाहीर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज, गुरुवारी या यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे. स्वत: सुरेश हाळवणकर यादी घेऊन मुंबईला रवाना झाले आहेत. आवाडे व हाळवणकर गटाला प्रत्येकी ३० जागांचे वाटप केल्याचे वृत्त आहे. दोन जागांवर तिढा कायम आहे. त्या जागा सोडूनच यादी जाहीर होणार आहे.
महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. ६५ जागांपैकी माजी आमदार प्रकाश आवाडे व सुरेश हाळवणकर गटाला प्रत्येकी ३० जागा देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. प्रभाग क्रमांक १५ आणि १६ मधील २ जागा वगळता उर्वरित सर्व जागांवर दोघांचे एकमत झाले आहे. हाळवणकर समर्थकांच्या ज्या दोन जागांवर माजी आमदार आवाडे यांचा विरोध आहे, त्या जागांना विधानसभेची किनार आहे.
या यादीवर अंतिम निर्णय मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेणार आहेत. आज, गुरूवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर ही यादी शुक्रवारी जाहीर होणार आहे. बुधवारी या यादीवर अंतिम हात फिरविण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी जाहीर होणाऱ्या उमेदवारी यादीमध्ये कोणाचा नंबर लागतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. ज्या जागांना आवाडे यांचा विरोध आहे, त्या दोन जागांवर भिजत घोंगडे राहणार आहे. शिवसेनेलाही काही जागा देण्यात येणार आहेत.
सांगलीतील बैठकीत मतभेद
सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आवाडे व हाळवणकर यांची बैठक झाली. काही कार्यकर्त्यांची व आपल्या गटात नसलेल्यांची उमेदवारी जाहीर करण्यावरून दोन नेत्यांमध्ये जोरदार चर्चा झाली. त्यामुळे दोघांत मतभेद असल्याचे पुन्हा एकदा समोर आले.