Kolhapur: शिरोळमध्ये महायुतीविरुद्ध महाआघाडी सामन्यात स्वाभिमानीची भूमिका ठरणार कळीची
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 18:01 IST2025-07-18T18:00:34+5:302025-07-18T18:01:22+5:30
मिनी मंत्रालयातील वर्चस्वासाठी नेत्यांचा लागणार कस

Kolhapur: शिरोळमध्ये महायुतीविरुद्ध महाआघाडी सामन्यात स्वाभिमानीची भूमिका ठरणार कळीची
संदीप बावचे
शिरोळ : जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक यावेळी महायुतीविरुद्ध महाआघाडी अशीच होण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांना उभारी देणाऱ्या या निवडणुकीत नेत्यांचीदेखील कसोटी लागणार आहे. या निवडणुकीत महायुतीला पुन्हा ताकद दाखवावी लागणार असून, विरोधी महाआघाडीतील नेत्यांच्या भूमिका काय असणार यावरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जि.प.च्या ७ व पं.स.च्या १४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. बदलत्या राजकारणामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना महत्त्व येणार आहे. विधानसभा निवडणुकीवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप व राजर्षी शाहू विकास आघाडी एकत्र लढण्याचे संकेत देण्यात आले होते. त्यामुळे महायुतीकडून आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, भाजपचे सावकर मादनाईक, मयूरचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील हे नेते कशी व्यूहरचना आखतात व जागा वाटपाचे धोरण कसे ठरते हेदेखील पाहावे लागणार आहे,
तर महाआघाडीकडून दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, उद्धवसेनेचे वैभव उगळे, चंगेजखान पठाण, शरद पवार गट कशा जोडण्या लावतात यावरदेखील निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांचीदेखील या निवडणुकीत भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राज्यातील राजकीय भूकंपामुळे तालुक्यातील राजकारणाची समीकरणे बदलली आहेत. एकूणच जि.प. व पं.स. निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा कस लागणार आहे.
'झेडपी'साठी इच्छुक
- दानोळी - सुजाता शिंदे, सतीश मलमे, उदय राऊत, आण्णासाहेब पाटील, रावसाहेब भिलवडे, राम शिंदे, प्रवीण खोत.
- उदगाव - सुदर्शन ककडे, प्रदीप चौगुले, ॲड. हिदायत नदाफ, जालिंदर ठोमके, प्रमोद पाटील, विजय कर्वे, रामभाऊ बंडगर, मनोहर पुजारी.
- आलास - मुनीर शेख, अशरफ पटेल, दादेपाशा पटेल, मल्लाप्पा चौगुले, ऋषिकेश शिंदे, राजाराम रावण, धनाजीराव जगदाळे, सुकुमार किनिंगे, आय.आय.पटेल, प्रशांत अपिणे.
- नांदणी - शेखर पाटील, राजू कुरडे, अजित पाटील, सागर पाटील.
- यड्राव - राजवर्धन निंबाळकर, सत्येंद्रराजे निंबाळकर, भरत लड्डा, आनंदराव साने, सरदार सुतार, अमोल चौगुले, बंटी पाटील.
- अब्दुललाट - विशाल चौगुले, विजय भोजे, दादासो सांगावे, बंडू पाटील, देवेंद्र कांबळे, आर. बी. पाटील, आप्पा पाटील.
- दत्तवाड - चंद्रकांत कांबळे, सुशील कांबळे, प्रमोद पाटील, संजय पाटील, मधुकर पाटील, हरिश्चंद्र पाटील, उमेश पाटील, बाबासो वनकोरे.
स्वाभिमानीच्या भूमिकेकडे लक्ष
गेल्या निवडणुकीत पंचायत समितीचे चार, तर जिल्हा परिषदेची एक जागा स्वाभिमानीने जिंकली होती. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील पराजय त्यातच सावकर मादनाईक यांनी भाजपात केलेला प्रवेश त्यामुळे मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीत माजी खासदार राजू शेट्टी यांची भूमिका काय राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
गतवेळचे बलाबल
७ जागा
भाजप - ३, राष्ट्रवादी - १, काँग्रेस - १, शिवसेना - १, स्वाभिमानी - १.
पंचायत समिती - १४ जागा
स्वाभिमानी - ४, काँग्रेस - ३, राष्ट्रवादी - ३, शिवसेना - २, अपक्ष - १, भाजप - १.
पंचायत समिती हेच लक्ष्य
गेल्यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेशी हातमिळवणी करून पंचायत समितीची सत्ता काबीज केली होती. अडीच वर्षांनंतर महाविकास आघाडीचे धोरण राबवून स्वाभिमानीला सत्तेत घेऊन पदेदेखील देण्यात आली होती. राज्यातील राजकीय भूकंपामुळे आगामी निवडणूक लढतीचे चित्र वेगळे असणार आहे.