कोल्हापुरात उपमहापौरपद उमेदवारीवरुन माजी आमदारांचे पुत्र झाले नाराज, शिवसेनेच्या कोट्यातून 'जनसुराज्य'ला उमेदवारी; नेमकं गणित काय.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:33 IST2026-02-03T13:27:19+5:302026-02-03T13:33:31+5:30
मग निवडून येऊन उपयोग काय..?

कोल्हापुरात उपमहापौरपद उमेदवारीवरुन माजी आमदारांचे पुत्र झाले नाराज, शिवसेनेच्या कोट्यातून 'जनसुराज्य'ला उमेदवारी; नेमकं गणित काय.. जाणून घ्या
कोल्हापूर : शिवसेनेच्या कोट्यातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरग यांना उपमहापौरपदाची उमेदवारी देण्याचा निर्णय रविवारी रात्री विमानतळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यातील चर्चेनंतर घेण्यात आला होता. त्यानंतर सत्यजित जाधव यांनी या पदासाठी आग्रह धरला. महापौर, स्थायी समिती सभापती पद हे भाजपला जाणार आहे, आता उपमहापौरपदही जनसुराज्य शक्तीला दिले तर शिंदेसेनेला कोणतेच पद मिळणार नाही. मग १५ नगरसेवक निवडून येऊन काय उपयोग असे सांगत सत्यजित जाधव आग्रही राहिले.
सत्यजित जाधव यांच्या विरोधात येथील न्यायालयात निवडणुकीसंदर्भात याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे उपमहापौर केल्यानंतर काही झाले तर शिंदेसेनेवर नामुष्की येऊ शकते असा युक्तिवाद शिंदेसेनेतील नगरसेवकांचा होता. परंतु, तरीही जाधव यांचे प्रत्यक्ष बोलून समाधान करण्याचे प्रयत्न शिंदेसेनेच्या काही नगरसेवकांनी केले, पण त्यांचा मोबाइल नॉटरिचेबल झाला. शेवटी ते नामनिर्देशनपत्र भरण्यासही आले नाहीत. उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाल्याची चर्चा महापालिका चौकात सुरू होती.
वाचा: एकच नगरसेवक, तरी जनसुराज्य शक्ती पक्षाला उपमहापौरपद; अक्षय जरग यांचे महत्त्व का वाढले?
गणित काय..?
अक्षय जरग यांनी शिंदेसेनेला पाठिंबा दिल्याने शिंदेसेनेचे संख्याबळ १६ होते. त्यामुळे स्थायी समितीचे सभापती पद एक वर्ष जास्त मिळू शकते, शिवाय स्वीकृत सदस्यही जास्त मिळू शकतो असे गणित मांडून त्यांचा पाठिंबा तातडीने मिळवण्यात आला. त्यासाठी त्यांना उपमहापौरपद देण्यात आले, परंतु त्यामुळे पहिल्याच वर्षी शिंदेसेना मात्र उपमहापौरपदापासून वंचित राहिली.