Kolhapur Municipal Election 2026: सतेज पाटील ‘फेक नॅरेटिव्ह किंग’, राजेश क्षीरसागर यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:11 IST2026-01-05T12:11:01+5:302026-01-05T12:11:57+5:30
आम्ही सत्तेत होतो, पण..

Kolhapur Municipal Election 2026: सतेज पाटील ‘फेक नॅरेटिव्ह किंग’, राजेश क्षीरसागर यांची टीका
कोल्हापूर : प्रत्येक निवडणुकीत नवी टॅगलाईन काढून सतेज पाटील फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचे राज्याचे किंग आहेत, अशी टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी रविवारी केली. शहराच्या थेट पाइपलाइनसाठी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन केले. तत्कालीन सरकारकडून ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. या योजनेत सतेज पाटील यांनी ७० कोटींचा ढपला पाडल्याचा आरोप त्यांच्याच पक्षातील आमदारांनी केला असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
महापालिका निवडणूूक प्रचारादरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, थेट पाइपलाइनच्या पाण्याने सतेज पाटील यांनी अभ्यंगस्नान केले. पण, गेल्या गणेशोत्सवात शहरातील रहिवाशांना पिण्याचे पाणी मिळाले नाही. ते सन २००५ पासून महापालिकेत सत्तेत होते. मात्र, अपयशाचे खापर नेहमीप्रमाणे दुसऱ्यांवर फोडत आहेत. वीस वर्षे सत्तेत असताना त्यांना शहराचा विकास करता आला नाही. उलट आयआरबी रस्ते प्रकल्प आणून कोल्हापूरकरांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी टोलची पावती फाडली.
वाचा : आयटी पार्कची ५०० कोटींची जागा कोरेंना ३० कोटींना दिली, सतेज पाटील यांचा आरोप
त्यांच्या टॅगलाईनला मतदार भुलत नाहीत. म्हणूनच मतदारांनी विधानसभा निवडणुकीत १०-० अशी घंटी वाजवली. रंकाळा तलावात ५५ लाखांत फाउंटन उभारता येतो, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी शहरातील दहा तलावांत इतक्या रकमेत फाउंटन उभा केल्यास मी माझ्याकडील पाच लाख रुपये घालून शासनाकडून मंजूर पाच कोटींचा ठेका त्यांना देण्यास तयार आहे. हे आव्हान त्यांनी स्वीकारावे.
वाचा : इचलकरंजीत ५ प्रभागांत हाय व्होल्टेज लढती
आम्ही सत्तेत होतो, पण..
गेल्यावेळी सतेज पाटील यांच्या आघाडीच्या सत्तेत आम्हीही होतो. पण, कंट्रोल त्यांच्याकडे होता. म्हणून त्यांच्या चुकीच्या निर्णयाला आम्हाला विरोध करता आला नाही. महापालिकेतील सत्तेचा वापर करून त्यांनी कॉलेज, हॉटेल, हॉस्पिटल उभारले, अशी टीका आमदार क्षीरसागर यांनी केली. सन २०१५ साली भाजप आणि शिवसेना अशी युती व्हायला पाहिजे होती. पण, ती झाली नाही. परिणामी सत्ता आम्हाला मिळाली नाही, असेही त्यांनी सांगितले.