संभाजीराजे निवडणूक प्रचारासाठी गेले अन् आनंदाने नदीतच सूर मारला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 13:14 IST2019-04-15T08:55:25+5:302019-04-15T13:14:38+5:30
छत्रपती शाहू महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या चांगुलपणाचे आणि साधेपणाचे अनेक उदाहरण दिले जातात.

संभाजीराजे निवडणूक प्रचारासाठी गेले अन् आनंदाने नदीतच सूर मारला...
कोल्हापूरचे - छत्रपती शाहू महाराजांच्या वंशज संभाजीराजे यांनी चक्क उन्हाच्या तडाख्यामुळे नदीच्या पाण्यात पोहण्याचा मनमुराद आनंद लुटला. विशेष म्हणजे उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले असता, संभाजीराजेंना हा मोह आवरता आला नाही. त्यामुळे त्यांनी नदीत पोहणाऱ्या बाल-गोपालांसह डुबकी घेतली, सूर मारला आणि महाराजांप्रमाणे आपल्या चिमुकल्या मावळ्यांसोबत मनमुराद आनंद लुटला.
छत्रपती शाहू महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या चांगुलपणाचे आणि साधेपणाचे अनेक उदाहरण दिले जातात. तर, त्याच घराण्यातील वंशज असलेल्या संभाजीराजे आणि उदयनराजेंच्याही साधेपणाची अनेक उदाहरणे दिली जातात. शेतात बांधावर जाणे, कुठही कट्ट्यावर बसून चहा पिणे, यांसह इतरही उदाहरणे आहेत. कालेजच्या विद्यार्थ्यांत मिसळणे, त्यांच्यासोबत धावणे, गप्पा गोष्टी करणे हेही महाराजांच्या साधेपणाचीच उदाहरणे आहेत. आता, संभाजीराजेंनी ऐन उन्हाळ्यात नदीत सूर मारून सर्वांनाच अचंबित केलं आहे. एरवी ज्या महाराजांना स्वीमिंग पुलात पोहणे, ज्यांना सहज शक्य आहे, त्यांनी असं सर्वांसोबत सार्वजनिक ठिकाणी पोहणे हे नवलच. त्यामुळे महाराजांच्या या सूर मारण्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे चंदगडला आले होते. त्यावेळी, तालुक्यातील ढोलगरवाडी येथील ओढ्यात तरुणांसोबत पोहोण्याचा आनंद लुटला. देशात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रत्येक नेता प्रचारात व्यस्त आहे. तर संभाजीराजे हे भाजपकडून खासदार आहेत, त्यामुळे ते महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. संभाजीराजेंना धलगरवाडी येथे रस्त्याकडेला असलेल्या नदीत पोहणारी मुले दिसली. राजेंनी गाडी थांबवली व पोहणाऱ्या मुलांकडे नजर फिरवली. संभाजीराजेंनी अंगावरील कपडे काढले व सुरक्षा रक्षक मनाई करत असतानाही त्यांनी पाण्यात सूर मारला.
संभाजीराजेंचा आवडता तालुका चंदगड
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका म्हणजे निसर्गाची मुक्त उधळण झालेलं ठिकाण. काजू, फणस आंबे यांच्या बागा आणि अस्सल ग्रामीण बाज टिकवून ठेवलेला हा तालुका. हे माझे अत्यंत आवडते ठिकाण. दोन दिवसांपासून मी चंदगड दौऱ्यावर आहे. असाच एकेठिकाणी जात असताना वाटेत एका नदीवर काही बालगोपाल व तरूण मुले पोहत असल्याचे दिसले. मग मलाही त्यांच्याबरोबर नदीत उतरण्याचा मोह आवरला नाही. आज कित्येक दिवसांनी अशापद्धतीने निसर्गाच्या सानिध्यात आणि आपल्यावर माया करणाऱ्या लोकांबरोबर, असा निर्मळ आनंद लुटता आला.