Kolhapur: पक्षांतराचा निर्णय घेताच राहुल पाटलांना धक्का, राधानगरीतील ‘पी.एन.’ समर्थक सतेज पाटील यांच्यासोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 16:33 IST2025-08-01T16:33:31+5:302025-08-01T16:33:55+5:30

सडोली खालसा : दिवगंत माजी आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील आणि राजेश पाटील यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे ...

Rahul Patil gets a shock after deciding to defect along with Satej Patil a PN patil supporter from Radhanagari | Kolhapur: पक्षांतराचा निर्णय घेताच राहुल पाटलांना धक्का, राधानगरीतील ‘पी.एन.’ समर्थक सतेज पाटील यांच्यासोबत

Kolhapur: पक्षांतराचा निर्णय घेताच राहुल पाटलांना धक्का, राधानगरीतील ‘पी.एन.’ समर्थक सतेज पाटील यांच्यासोबत

सडोली खालसा : दिवगंत माजी आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील आणि राजेश पाटील यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेताच राधानगरीतील ‘पी.एन.’समर्थकांनी त्यांच्यासोबत न जाण्याचा निर्णय घेतला. या सर्वांनी तातडीने कोल्हापुरात जाऊन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सक्रीय राहण्याचे घाेषित केले. राष्ट्रवादीच्या प्रवेशाआधीच राहुल पाटील यांना हा धक्का मानला जातो.

पी. एन. पाटील हे जिल्हाध्यक्ष असताना राधानगरी तालुक्यात काँग्रेस त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती. पी. एन. हयात असेपर्यंत त्यांना धक्का देण्याच्या भानगडीत फारसे कोणी पडले नाही. परंतु त्यांच्या निधनानंतरच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राहुल पाटील यांचा पराभव झाला आणि हा गट पर्यायाच्या शोधात लागला. यातूनच सुरुवातीला भाजपची चर्चा सुरू झाली. परंतु यासाठी तीव्र विरोध झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पर्याय पुढे आला.

पाटील गुरुवारी सकाळी मुंबईत अजित पवार यांना भेटताच राधानगरीतील कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सतेज पाटील यांच्या भेटीला रवाना झाले. साळोखेनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात ही भेट झाली.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हिंदूराव चौगुले, ‘गोकुळ’चे संचालक अभिजित तायशेटे, राजाराम साखर कारखान्याचे माजी संचालक सुधाकर साळोखे, भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील, भोगावतीचे माजी संचालक ए. डी. पाटील गुडाळ, संजयसिंह पाटील तारळे, अशोक साळोखे, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाजीराव चौगले, मोहन धुंदरे, लहुमा कुसाळे हे उपस्थित होते.

युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष वैभव तहसीलदार सुनील हिंदुराव चौगले, राजेंद्र यादव, संजय कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आमच्याशी पाटील बंधूंनी चर्चा केली होती. त्यांच्या काही अडचणी असतील म्हणून त्यांनी निर्णय घेतला असेल. आम्ही पी. एन. पाटील यांच्यावर प्रेम करणारी मंडळी आहोत. त्यामुळे पक्ष सोडायचा नाही असा निर्णय आम्ही घेतला. आमचे त्यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत. परंतु आम्ही पक्षासोबत राहण्याचे ठरवले. खासदार शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यरत राहणार आहोत. - हिंदूराव चौगुले, तालुकाध्यक्ष, राधानगरी कॉंग्रेस
 

लढणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देणे ही माझी जबाबदारी आहे. असे निष्ठावंत कार्यकर्तेच पक्षाची खरी मुलूख मैदान तोफ आहेत. अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पक्ष मजबूत करणार आहे. - आमदार सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस

Web Title: Rahul Patil gets a shock after deciding to defect along with Satej Patil a PN patil supporter from Radhanagari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.