'कोल्हापूर कस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली; सतेज पाटील-कृष्णराज महाडिकांच्या कमेंटनंतर राजकारण तापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:35 IST2025-12-25T12:33:34+5:302025-12-25T12:35:39+5:30
विशेष म्हणजे आरजेच्या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला

'कोल्हापूर कस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली; सतेज पाटील-कृष्णराज महाडिकांच्या कमेंटनंतर राजकारण तापले
कोल्हापूर : ऐन महापालिका निवडणुकीत 'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं' या काँग्रेसच्या मोहिमेवरून आता राजकारण तापले आहे. या कॅम्पेनचे बॅनर शहरभर लागल्यानंतर त्यावर एका आरजेने यावर इन्स्टावर रिल करत खरंच आम्ही म्हणतोय तसं होणार का? रस्त्यांची वाट लागलीय, रंकाळ्याचा विषय आहे, पाण्याची बोंबाबोब आहे, ही पतंगबाजी आहे अशी टिप्पणी केली.
त्यावर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बदल घडवण्यासाठी आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी मी एक पाऊल टाकत आहे. आपणही सोबत या अशी हाक दिली. सोशल मीडियावर रंगलेल्या या पोस्टबाजीनंतर खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी ज्या लोकांनी हा टॅगलाईन दिला आहे, तेच लोक अनेक वर्षे महानगरपालिकेत सत्तेत होते. त्या काळात कोल्हापूरच्या अपेक्षित विकासासाठी ते का अपयशी ठरले? असा सवाल केला आहे.
महाडिक यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर राजकारण रंगले आहे. विशेष म्हणजे आरजेच्या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. मतदान करताना शेवटी दारूची बाटली, जेवणं आणि कोणाचं पाकीट यावरच मतदान होणार.. मग कश्याला चांगले रस्ते, स्वच्छ पाणी आणि चांगल्या सुविधा मिळत्यात? अशा विचारणा अनेकांनी केल्या आहेत.
गेल्या साडेचार वर्षांत राज्यात सरकार महायुतीचे आहे. त्यांच्या काळात रस्त्यावर धूळ का, पिण्याचे पाण्याची पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही. खड्ड्यांतून रस्ते शोधून सापडत नाहीत हे पोस्ट करणाऱ्यांना दिसत नाही हेच दुर्दैव आहे. राज्य सरकारने सत्तेच्या काळात कोल्हापूरला काय दिले हे त्यांनी सांगावे. काँग्रेसची टॅगलाईन लोकांनी उचलून धरली आहे याचाच पोटशूळ पोस्ट करणाऱ्यांना उठला आहे. - राजेश लाटकर, नेते,काँग्रेस.