Kolhapur: मदरसामधील मुलाच्या खूनप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु; पाय बांधून, तोंडात बोळा घालून दिला विजेचा शॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:54 IST2025-06-19T13:51:02+5:302025-06-19T13:54:03+5:30
अल्पवयीन मुले भयभीत

Kolhapur: मदरसामधील मुलाच्या खूनप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु; पाय बांधून, तोंडात बोळा घालून दिला विजेचा शॉक
हातकणंगले : आळते (ता. हातकणंगले) येथील मदरसामध्ये ११ वर्षीय फैजान नजीम यांचा विजेचा शॉक देऊन झालेल्या खुनाच्या प्रकारानंतर तालुका आणि जिल्हा प्रशासन हादरले आहे. या घटनेची तीव्रता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संस्था, पोलिस आणि शिक्षण व बालविकास अधिकारी यांची तातडीची बैठक घेऊन संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याच्या सूचना केल्या आहेत. फैजानचा मृतदेह त्यांच्या आई - वडिलांनी ताब्यात घेऊन कोल्हापूर येथील बागल चौक दफनभूमीत अंत्यसंस्कार केले.
दरम्यान, बुधवारी दिवसभर मौलवी आणि शिक्षण संस्थेच्या ट्रस्टीची पोलिसांनी झाडाझडती घेतली. शिक्षण घेणारी मुले, त्यांचे रहिवास पत्ते, कौटुंबिक माहिती, मिळणारा निधी यासह इतर सर्व प्रकारची चौकशी सुरू होती. आळतेच्या मदरसामध्ये बिहार, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, झारखंड, यासह इतर राज्यातील ९० मुले शिक्षण घेतात. फैजान हा चार महिने शिक्षण घेऊन आपल्या आई- वडिलांकडे गेला होता. एप्रिलमध्ये तो पुन्हा मदरसामध्ये दाखल झाला होता. तो त्यांचा भाऊ आणि संशयित खोली नंबर २ मध्ये राहत होते. १६ जूनच्या रात्री त्यांचा १४ वर्षीय सहकाऱ्याने इलेक्ट्रिक वायर त्यांच्या दोन्ही पायाला बांधून तोंडात बोळा घालून विजेचा शॉक देऊन खून केल्याचा प्रकार उघड झाला.
फैजानच्या मृत्यूने त्यांच्या आई - वडिलांना धक्का बसला आहे. मूळचे बिहारचे असलेले हे कुंटुब मोलमजुरीसाठी हैदराबादमध्ये राहते. मंगळवारी सकाळी ते सी.पी.आर. रुग्णालयात पोहोचले. त्यांनी मुलाला पाहताच हंबरडा फोडला.
अल्पवयीन मुले भयभीत
मदरसात झालेल्या या प्रकाराने शिक्षण घेणारी इतर अल्पवयीन मुले भयभीत झाली आहेत. दोन -तीन दिवसांच्या चौकशीने सर्वच मुले मानसिक तणावात असल्याने बालविकास विभागाकडून त्यांचे समुपदेशन करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न सुरू आहे.