Kolhapur: विद्यार्थिनींनी शाळेत टिकली न लावण्याचा निर्णय, पालकांनी मुख्याध्यापकांना धरले धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 11:50 IST2025-09-16T11:49:38+5:302025-09-16T11:50:05+5:30
निर्णय घेतला मागे

Kolhapur: विद्यार्थिनींनी शाळेत टिकली न लावण्याचा निर्णय, पालकांनी मुख्याध्यापकांना धरले धारेवर
इचलकरंजी : विद्यार्थिनींनी शाळेत टिकली न लावण्याचा निर्णय आंतरभारती विद्यालयाने घेतला होता. त्यावर संतप्त हिंदुत्ववादी संघटना व पालकांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापक व शिक्षकांवर प्रश्नांचा भडिमार केला. अखेर टिकली न लावण्याचा निर्णय मागे घेण्यात आला.
विद्यार्थिनी एकसारखी टिकली लावत नसल्याने शिस्तीचे पालन होत नसल्याचे कारण पुढे करत आंतरभारती विद्यालयाच्या व्यवस्थापनाने विद्यार्थिनींनी शाळेत येताना टिकली लावू नये, असा निर्णय घेतला होता. त्याची माहिती विद्यार्थिनींनी पालकांना दिली.
संतप्त पालक आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते शाळेत जमले. त्यामध्ये गजानन महाजन-गुरूजी, प्रसाद जाधव, मंगेश मस्कर, प्रमोद खुडे, अक्षय बुनगे, अतुल मोरबाळे, आदींचा समावेश होता. त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांवर प्रश्नांचा भडिमार केला. अचानक पालक व संघटनांचे कार्यकर्ते आल्याने एकच गोंधळ उडाला. सुमारे पाऊण तास गोंधळ सुरूच होता.
हिंदुत्ववादी परंपरा, संस्कृती जपण्यास कोणत्याही पद्धतीने मनाई करता येणार नाही, असे ठणकावून सांगितले तसेच हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. अखेर मुख्याध्यापकांनी शाळेत टिकली न लावण्याचा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केले.