Kolhapur Municipal Election Voting 2026: कोल्हापुरातील नेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार, सात ठिकाणी मतदान केंद्रात तांत्रिक बिघाड
By संदीप आडनाईक | Updated: January 15, 2026 17:13 IST2026-01-15T17:08:32+5:302026-01-15T17:13:23+5:30
तांत्रिक अडचणींमुळे मतदारांचा खोळंबा

Kolhapur Municipal Election Voting 2026: कोल्हापुरातील नेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार, सात ठिकाणी मतदान केंद्रात तांत्रिक बिघाड
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी कोल्हापुरात आज, गुरुवारी सकाळपासून सुरु असलेल्या मतदानासाठी मतदारांचा मोठा उत्साह दिसून येत आहे. अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर रांगाच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. दुपारी साडेचार वाजेपर्यंत ५०.८५ टक्के मतदान झाले.
खासदार श्री शाहू छत्रपती यांनी नवीन राजवाडा शेजारील असलेल्या न्यू पॅलेस मराठी शाळा मतदान केंद्रात, जाऊन मतदानाचा अधिकार बजावला. आमदार सतेज पाटील यांनी कसबा बावडा येथील मतदान केंद्रावर, आमदार राजेश क्षीरसागर यांनी उद्यान कार्यालयात, खासदार धनंजय महाडिक यांनी सपत्नीक रुईकर कॉलनी येथील मतदान केंद्रावर मतदान केले. नेत्यांनी आपापल्या मतदान केंद्रावर मतदान करुन सर्व प्रभागातील मतदानाची पाहणी केली.
साडेतीन वाजेपर्यंत १, २७, ९७३ पुरुष आणि १, २३, ५६५ महिला अशा एकुण २, ५१, ५४८ जणांनी मतदान केले. सकाळी ९.३० वाजेपर्यंत केवळ ९.६४ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या दोन तासांत मतदानाचा वेग किंचित वाढला असून, ११.३० वाजेपर्यंत शहरात एकूण २२.४५ टक्के मतदानाची नोंद झाली. यामध्ये ६०,५३१ पुरुष आणि ५०,५४७ महिला अशा एकूण ११,१०८५ मतदारांनी आपला हक्क बजावला. दुपारी १.३० वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. यामध्ये ९५,६६१ पुरुष आणि ८७,३६१ महिला अशा एकूण १८,३०३० मतदारांनी आपला हक्क बजावला.
कोल्हापुरच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्यासमवेत शीतल तेली-उगले यांनी ताराबाई पार्क येथील जीएसटी कार्यालयातील पिंक मतदान केंद्रास, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, छत्रपती शाहाजी महाविद्यालय, कॉमर्स कॉलेज, गोखले कॉलेज, महाराष्ट्र हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, प्रिन्स शिवाजी इंग्लिश स्कूल, आय.टी.आय., सायबर कॉलेज येथील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक गणेश निऱ्हाळी यांनीही शहरातील ताराराणी विद्यापीठ, सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर, लक्ष्मीबाई जरग शाळा, शिलादेवी शिंदे सरकार हायस्कूल, तपोवन शाळा व पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथील मतदान केंद्रांची पाहणी केली.
तांत्रिक अडचणींमुळे मतदारांचा खोळंबा
दरम्यान, लक्षतीर्थ वसाहत, महालक्ष्मी मंदिर परिसर आणि जुना बुधवार पेठ येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल अशा सात मतदान केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने गोंधळ उडाला. मशीनमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी खास पथक पाचारण करण्यात आले. या तंत्रज्ञांनी स्वतंत्र बॅलेट युनिट बदलले. मात्र यासाठी लागलेल्या तासभराच्या वेळामुळे मतदारांचा खोळंबा झाला. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत राहिली.