Kolhapur Politics: सासूमुळे वाटणी अन् सासूच वाटणीला; राधानगरी मतदारसंघातील चित्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 04:18 PM2024-04-22T16:18:10+5:302024-04-22T16:22:02+5:30

नेते व्यासपीठावर; पण कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे काय?

MLA Prakash Abitkar and former MLA K.P. Patil together In the Kolhapur Lok Sabha elections, What about the workers | Kolhapur Politics: सासूमुळे वाटणी अन् सासूच वाटणीला; राधानगरी मतदारसंघातील चित्र 

Kolhapur Politics: सासूमुळे वाटणी अन् सासूच वाटणीला; राधानगरी मतदारसंघातील चित्र 

दत्ता लोकरे

सरवडे : विधानसभा, बिद्री साखर कारखान्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत एकमेकांविरोधात शड्डू ठोकणाऱ्या ‘राधानगरी’ विधानसभा मतदारसंघातील नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र यावे लागले आहे. सासूसाठी वेगळो झालो; पण सासूच वाटणीला आली, अशी वेळ तेथील कार्यकर्त्यांवर आली असून नेते व्यासपीठावर आले; पण कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे काय? या प्रश्नाचे उत्तर ४ जूनलाच समजणार आहे.

सत्तेसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात शड्डू ठोकायचा, आरोप-प्रत्यारोपाच्या माध्यमातून एकमेकांचे वस्त्रहरण करायचे, व्यक्तिगत टीकाटिप्पणीने हैराण करून सोडायचे आणि राज्यातील आघाडी व महायुतीच्या राजकारणामुळे पुन्हा एकत्र येण्याची वेळ स्थानिक कार्यकर्त्यांवर आली आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भूषण पाटील व वीरेंद्र मंडलिक हे एकमेकांविरोधात लढले होते. यामध्ये मंडलिक यांना पराभव पत्कारावा लागला होता. 

शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील व खासदार संजय मंडलिक तर ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील व प्रवीणसिंह पाटील यांच्यातील संघर्ष जिल्ह्याने पाहिला आहे. ‘बिद्री’च्या निवडणुकीत मुरगूडकर बंधू एकमेकांविरोधात लढले होते. अजून बिद्रीच्या निवडणुकीची बोटावरील शाई जायची आहे, तोपर्यंत हे सगळे नेते एकाच व्यासपीठावर आले आहेत.

तीच अवस्था भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, ‘गोकुळ’चे संचालक राजेंद्र मोरे यांच्यासह दिग्गजांची झाली आहे. विधानसभेला तर आमदार प्रकाश आबीटकर व के. पी. पाटील यांच्यात विधानसभा व बिद्रीला संघर्ष झाला. आता दोघेही खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. सासूसाठी वेगळो झालो आणि सासूच वाटणीला आली, असे म्हणण्याची वेळ दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांवर आली आहे.

वरिष्ठ नेत्यांच्या दबावापोटी नेते इच्छा नसताना एकत्र असल्याचे दाखवत आहेत; पण स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनाचे काय, हा प्रश्न आहेच.

Web Title: MLA Prakash Abitkar and former MLA K.P. Patil together In the Kolhapur Lok Sabha elections, What about the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.