Kolhapur Crime: कारखान्यातील कामाच्या वादातून शहापुरात परप्रांतीय कामगाराचा खून, संशयित पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 17:48 IST2025-08-29T17:30:28+5:302025-08-29T17:48:34+5:30
डोक्यात व तोंडावर सपासप वार झाल्याने संतोष रक्ताच्या थारोळ्यात पडला

Kolhapur Crime: कारखान्यातील कामाच्या वादातून शहापुरात परप्रांतीय कामगाराचा खून, संशयित पसार
इचलकरंजी : किरकोळ वादातून शहापूर पोलिस ठाण्यासमोरील परिसरात सोमवारी रात्री यंत्रमाग कारखान्याच्या दारात कामगाराचा निर्घृण खून झाला. संतोष गोपाल पांडा (वय ३८, रा. मूळ ओडिशा, सध्या रा. विनायक हायस्कूल समोर, शहापूर) असे त्याचे नाव आहे. घटनेनंतर चार ते पाच परप्रांतीय संशयित कामगार पसार झाले. याबाबत नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलिसात सुरू होते.
घटनास्थळ आणि आयजीएम रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी, शहापूर येथील एका यंत्रमाग कारखान्यात संतोष व इतर संशयित हल्लेखोर एकत्र काम करतात. त्यांच्यात काही दिवसांपासून काम करण्यावरून वाद सुरू होता. बुधवारी रात्रीही त्यांच्यात जोरदार वाद झाला होता. तो मिटवण्यात आला होता. मात्र, गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा जोरात भांडण सुरू झाले. वाद घालत सगळे कारखान्याबाहेर आले.
यावेळी वाद अधिकच विकोपाला गेला आणि हल्लेखोर कामगारांनी अचानक लोखंडी हत्यार उचलून संतोष पांडा याच्यावर हल्ला चढवला. डोक्यात व तोंडावर सपासप वार झाल्याने संतोष रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. हा गोंधळ एकूण इतर कामगार बाहेर आले. त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या संतोष पांडा याला तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणातील चार ते पाच संशयित परप्रांतीय कामगार हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले आहेत. शहापूर पोलिस ठाण्याचे पथक त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.