Kolhapur: करवीर मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 12:00 IST2024-11-18T11:59:40+5:302024-11-18T12:00:55+5:30
कळे : करवीर विधानसभेचे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे प्रचारातून परतत असताना अज्ञातांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. त्यात ...

Kolhapur: करवीर मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला
कळे : करवीर विधानसभेचे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे प्रचारातून परतत असताना अज्ञातांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. मानवाड येथे काल, रविवारी (दि.१७) रात्री सव्वा अकरा वाजता हा प्रकार घडला.
घोरपडे हे जांभळी खोऱ्यातील मानवाड (ता.पन्हाळा) येथे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी गेले होते. परत येताना मानवाडलगत रस्त्याशेजारी सहा-सात अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. ते कार्यकर्ते असावेत किंवा काही त्यांना अडचण असावी असा समज होऊन त्यांनी गाडी बाजूला घेतली व गाडीतून उतरले असता त्यांनी क्षणाचा विलंब न करता काठी व धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात घोरपडे यांच्यासोबत असणारे डॉ. शुभम जाधव (मांडुकली, ता. गगनबावडा) हे खाली उतरले. गाडीमध्ये किती व्यक्ती आहेत याचा अंदाज न आल्याने संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला करून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शेतवडीतून पलायन करतेवेळी दगडफेक केली. त्यामध्ये गाडीचेही नुकसान झाले.
घोरपडे यांच्या हाताला व डोक्याला गंभीर इजा होऊन रक्तस्त्राव झाला. त्यांना जवळच्या कळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले. यावेळी कार्यकर्त्यांना घडला प्रसंग समजताच गर्दी केली. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात हलविले. रात्री उशिरापर्यंत कळे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.