Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण, दोन स्वतंत्र गट कार्यरत; आता त्यात पण फुटाफुटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:12 IST2025-12-25T12:11:37+5:302025-12-25T12:12:33+5:30
दोन्हीकडेही नव्यांना घेऊन नवीन डाव

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण, दोन स्वतंत्र गट कार्यरत; आता त्यात पण फुटाफुटी
अतुल आंबी
इचलकरंजी : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होता, त्यावेळीही इचलकरंजीत सुरुवातीपासूनच दोन गट कार्यरत होते. त्यांची कार्यालयेही स्वतंत्र होती. दरम्यान, मूळ राष्ट्रवादीत दोन गट झाल्यानंतर इचलकरंजीतील दोन्ही गट काही दिवसांसाठी राष्ट्रवादी (शरद पवार) गटात एकत्र आले आणि पुन्हा स्वतंत्र झाले. त्यात आणखीन फूट पडत अनेक माजी नगरसेवक वेगवेगळ्या पक्षांत निघून गेले. त्यामुळे राष्ट्रवादीत मोठी पडझड झाली आहे.
सुरुवातीपासून इचलकरंजीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मदन कारंडे आणि अशोक जांभळे या दोघांचे स्वतंत्र गट कार्यरत होते. इचलकरंजी नगरपालिकेसह या विधानसभा मतदारसंघातील अन्य काही ग्रामीण भागातही दोघांचे स्वतंत्र गट असायचे. तेथील ग्रामपंचायतींमध्ये त्या गटांच्या नावाने ते निवडून येत होते. दोघांचे इचलकरंजी शहरात दोन स्वतंत्र कार्यालये होती. त्यातून त्या-त्या गटांचे कामकाज सुरू होते. अगदी गणेश विसर्जन मिरवणुकीतही दोघांचे स्वतंत्र स्वागत कक्ष होते.
दरम्यान, राज्यातील राष्ट्रवादीत उभी फूट पडून राष्ट्रवादी (शरद पवार) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) असे दोन गट झाले. त्याआधी काही दिवस कारंडे-जांभळे गट स्थानिक पातळीवर एकत्र आले होते. तोपर्यंत वर फूट पडली. त्यानंतर दोघांनी आम्ही राष्ट्रवादी (शरद पवार) गटात एकत्रित असल्याचे पत्रकार बैठक घेऊन जाहीर केले. परंतु ही एकी जास्त काळ टिकली नाही. कारंडे गटातील एक गट फुटून अजित पवार गटात गेला. त्यापाठोपाठ काही दिवसांनी जांभळे गटही अजित पवार गटात गेला.
हा फुटीचा प्रवास एवढ्यावरच थांबला नाही. त्यापुढे कारंडे आणि जांभळे या दोन्ही गटालाही फुटीरतेचे ग्रहण लागले. दोघांच्यातून माजी नगरसेवक फुटून बाहेर पडले. त्यातील कारंडे गटातील चारजण भाजप, दोनजण शिंदेसेना, एक शेतकरी संघटना व एक स्वतंत्र आहे, तर जांभळे गटातील तीन भाजप आणि एकजण तटस्थ आहे.
कारंडे गट
मदन कारंडे गटातील दहा नगरसेवकांपैकी विठ्ठल चोपडे, शुभांगी माळी, मंगेश कांबुरे, दीपाली हुक्कीरे हे चारजण भाजपमध्ये, प्रकाश पाटील आणि अनिता कांबळे हे दोघे शिंदेसेना, दीपाली बेडक्याळे हे शेतकरी संघटना, तर मदन जाधव हे सध्या स्वतंत्र किंवा चाळके गटासोबत आहेत. असे एकूण आठजण बाहेर पडले आहेत.
जांभळे गट
अशोक जांभळे गटातील निवडून आलेल्या सातजणांपैकी तिघेजण घरातीलच सदस्य होते. तर अन्य नगरसेवकांपैकी तानाजी हराळे, मंगल मुसळे आणि स्वीकृत सदस्य राजू खोत हे तिघेजण भाजपमध्ये, तर रवी कांबळे हे तटस्थ आहेत. असे चारजण बाहेर पडले आहेत. त्यामुळे लतिफ गैबान हे निवडून आलेले एकमेव सदस्य त्यांच्यासोबत आहेत.
दोन्हीकडेही नव्यांना घेऊन नवीन डाव
कारंडे-जांभळे दोन्ही गटाकडून निवडून आलेले नगरसेवक फुटून बाहेर पडले असले तरी जे राहिले आहेत, त्यांच्यासोबत अन्य नव्या उमेदवारांना घेऊन हे दोन्ही गट महापालिका निवडणुकीसाठी नव्या जोमाने कामाला लागले आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांना यश मिळविण्यासह मागील आकड्यांच्या पुढे जाण्याची त्यांची धडपड सुरू आहे.