'गादी विरुद्ध मोदी'! प्रचाराचा धुरळा, कोल्हापुरात कुणाची हवा?, शाहू महाराज की संजय मंडलिक?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 10:10 AM2024-04-11T10:10:12+5:302024-04-11T10:16:28+5:30

Lok Sabha Elections 2024 : कोल्हापूर मतदारसंघात कोणाचे वर्चस्व असणार, हे निकालानंतर येणाऱ्या मताधिक्यावर अवलंबून असणार आहे.

Lok Sabha Elections 2024 : Shahu Maharaj Chhatrapati and Sanjay Mandalik, Elections rally, campaigning in Kolhapur Parliamentary Constituency | 'गादी विरुद्ध मोदी'! प्रचाराचा धुरळा, कोल्हापुरात कुणाची हवा?, शाहू महाराज की संजय मंडलिक?

'गादी विरुद्ध मोदी'! प्रचाराचा धुरळा, कोल्हापुरात कुणाची हवा?, शाहू महाराज की संजय मंडलिक?

Kolhapur Parliamentary Constituency : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी कामाला लागले आहेत. जिल्ह्यातील प्रमुख बड्या नेत्यांनी प्रचारासाठी यंत्रणा सतर्क केली असून मोठ्या सभांचा फड कुठे ना कुठे रोज भरताना दिसून येत आहे. तर काही ठिकाणी प्रचारासाठी आणि उमेदवार कशा पद्धतीने निवडून येतील, यासंदर्भात रणनीती ठरवली जात आहे.

महाविकास आघाडीकडून कोल्हापूरच्या गादीचे वारस छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात असलेले महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक हे सलग तिसऱ्यांदा रिंगणात उतरलेले आहेत. खरंतर ही लढत 'गादी विरुद्ध मोदी' अशी होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात दोन्ही उमेदवारांकडून शक्ती प्रदर्शन आणि तालुकानिहाय प्रचारावर जोर दिला जात आहे.

संजय मंडलिक यांच्या प्रचाराची धुरा पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजपाचे खासदार धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर अशा प्रमुख नेत्यांनी उचललेली आहे. या प्रत्येक नेत्याने आपापल्या विधानसभा मतदारसंघात तालुकानिहाय मोठे मेळावे, सभा आयोजित केले आहे. या माध्यमातून संजय मंडलिक यांचे शक्ती प्रदर्शन केले जात आहे. कोल्हापूर शहरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचारावर जोर दिला आहे.

चंदगड येथील यशंवतनगरमध्ये झालेल्या सभेत उदय सामंत यांनी यांनी संजय मंडलिक यांना तालुक्यात लाखाचे मताधिक्य देण्याचा निश्चय केल्याचे सांगितले. तर कागल येथील एका सभेत तर हसन मुश्रीफ यांनी तालुक्यात लाखाचे मताधिक्य मिळवणार असे सांगून एकप्रकारे विरोधकांना धडकी भरवली आहे. याशिवाय, संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवावी, निवडणुकीत कशा पद्धतीने प्रचार करावा तसेच रणनीती काय असावी? यावर चर्चा करण्यासाठी राजेश क्षीरसागर यांनी 'मिसळ पे चर्चा' चे आयोजन केले होते. यावेळी जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. 

दुसरीकडे, महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांना निवडणुकीत विजयी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील आणि संजय घाडगे यांनी मैदानात शड्डू ठोकला आहे. शाहू महाराज यांच्या प्रचाराची मुख्य धुरा सतेज पाटील यांच्या खांद्यावर आहे. दोन दिवसांपूर्वी शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, गेल्या काही दिवसांपासून शाहू महाराजांच्या प्रचारासाठी सतेज पाटील ठिकठिकाणी सभा घेताना दिसून येत आहेत. याशिवाय, कोल्हापूर उत्तर व दक्षिण या मतदारसंघात आमदार ऋतुराज पाटील व आमदार जयश्री जाधव तर करवीर विधानसभा मतदारसंघात पी. एन. पाटील यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. 
  
कोल्हापूर मतदारसंघाच्या उत्तरेकडील भागात काँग्रेसचे वर्चस्व आहे तर दक्षिणेकडे महायुतीचे वजन आहे. त्यामुळे दक्षिणेकडे भागात महाविकास आघाडीकडून प्रचारावर भर देण्यात येत आहे. चंदगडमध्ये विद्यमान आमदार राजेश पाटील यांचे संजय मंडलिक हे मेहुणे आहेत. तर कागल, आजरा, गडहिंग्लज भागात हसन मुश्रीफ हे संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी रणनीती आखत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून या भागात जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांच्यासह गोपाळराव पाटील, नंदिनी बाभुळकर, स्वाती कोरी यांच्याकडे प्रचाराची मोठी जबाबदारी असल्याचे दिसून येत आहे.

याचबरोबर, कोल्हापूरात वंचितनेही शाहू महाराज यांना पाठिंबा दिला आहे. तसेच, शाहू महाराज छत्रपती यांचे सुपुत्र संभाजीराजे छत्रपती आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी गावं पिंजून काढत आहेत. संभाजीराजे यांना मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग असला तरी या मतदार संघातील महायुतीच्या बड्या नेत्यांचा प्रभाव देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांचे प्रचार मोठ्या ताकतीने सुरू असून घरातील सर्व मंडळी झोकून देऊन काम करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात कोणाचे वर्चस्व असणार, हे निकालानंतर येणाऱ्या मताधिक्यावर अवलंबून असणार आहे.

Web Title: Lok Sabha Elections 2024 : Shahu Maharaj Chhatrapati and Sanjay Mandalik, Elections rally, campaigning in Kolhapur Parliamentary Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.