Kolhapur North By Election Result: शिवसेनेने मातोश्रीचा आदेश खरा करुन दाखवला..भाजपला लीड तुटलेच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 11:46 IST2022-04-16T11:46:05+5:302022-04-16T11:46:56+5:30
कोल्हापूरच्या जनतेने काँग्रेसला हात देवून एकप्रकारे महाविकास आघाडीला बळ दिले.

Kolhapur North By Election Result: शिवसेनेने मातोश्रीचा आदेश खरा करुन दाखवला..भाजपला लीड तुटलेच नाही
कोल्हापूर : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी पंधराव्या फेरीअखेर निर्णायक १३ हजार ९९८ मतांची आघाडी घेतली आहे. एकूण २६ फेऱ्या आहेत. भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी तगडे आव्हान दिले परंतू कोल्हापूरच्या जनतेने काँग्रेसला हात देवून एकप्रकारे महाविकास आघाडीला बळ दिले.
मोजलेल्या पंधरापैकी दहा फेऱ्यांमध्ये काँग्रेसला तर पाच फेऱ्यांमध्ये भाजपला मताधिक्कय मिळाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेला शब्द शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेसच्या उमेदवारास मतदान करून खरा करून दाखविल्याचे चित्र पुढे आले आहे.
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबरमध्ये निधन झाल्याने ही निवडणूक झाली. एकूण २ लाख ९१ हजार मतदारांपैकी १ लाख ७५ हजार ३४१ (६१.१९ टक्के) मतदारांनी हक्क बजावला होता. एकूण १५ उमेदवार रिंगणात होते. परंतू लढत दुरंगीच झाली.
भाजपचे हिंदुत्व विरुध्द महाविकास आघाडीचा शिव-शाहूचा विचार अशीच ही लढत झाली. कोल्हापूरची जनता शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांच्या शहरात कोणत्या विचारांना बळ देते याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. शनिवारी दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत एकूण ९८ हजार ९१४ मते मोजण्यात आली. त्यापैकी काँग्रेसच्या जयश्री जाधव यांन ५८३५१ तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ४४३५३ मते मिळाली.
तिसऱ्या क्रमांकाची ९१६ मते नोटाला मिळाली आहेत. करुणा मुंडे यांना आतापर्यंत अवघी ७५ मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शाहीन शेख यांना ३१९ मते मिळाली आहेत. पोस्टल मतांमध्ये काँग्रेसच्या जाधव यांना ३१५ तर भाजपच्या कदम यांना २१४ मते मिळाली आहेत. टपाली मतांतही जाधव यांना १०१ मतांची आघाडी मिळाली.