चेतन नरके यांच्या मागे पहाडासारखे उभे राहू, सतेज पाटील यांची ग्वाही; नरके यांचा शाहू छत्रपतींना बिनशर्त पाठिंबा
By राजाराम लोंढे | Updated: April 30, 2024 19:15 IST2024-04-30T19:14:19+5:302024-04-30T19:15:28+5:30
मुख्यमंत्र्यांवर गल्लीबोळात फिरण्याची वेळ, आमदार पी. एन. पाटील यांची टीका

चेतन नरके यांच्या मागे पहाडासारखे उभे राहू, सतेज पाटील यांची ग्वाही; नरके यांचा शाहू छत्रपतींना बिनशर्त पाठिंबा
कोपार्डे : चेतन नरके यांनी गेली अडीच वर्षे गाव आणि वाड्यावस्त्यांवर संपर्क मोहीम राबवली, तरीही त्यांनी थांबून मनाचा मोठेपणा दाखवला आहे. त्यांची अडीच वर्षांची मेहनत, कष्ट वाया जाऊ देणार नाही. आपण व आमदार पी. एन. पाटील यांच्या मागे पहाडासारखे उभे राहू, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. तर, ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’तील उमेदवारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गल्लीबोळातून फिरण्याची वेळ आल्याची टीका आमदार पी. एन. पाटील यांनी केली.
वाकरे (ता. करवीर) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या समर्थनार्थ डॉ. चेतन नरके यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके होते. यावेळी डॉ. नरके यांनी शाहू छत्रपती यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘करवीर’मध्ये स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे यांनी सहकाराची बिजे राेवली, आगामी काळात त्यांना सहकार बळकटीसाठी काम करत असतानाच अरुण नरके यांचा विचार पुढे घेऊन जायचा आहे.
शाहू छत्रपती म्हणाले, मी जरी जग फिरलो असलो, तरी डॉ. चेतन नरके यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्याकडे कोल्हापूरच्या विकासाचे व्हीजन असून, तेच घेऊन पुढे जाऊ.
आमदार पी. एन. पाटील म्हणाले, शाहू छत्रपतींनी काय केले, म्हणून विरोधी उमेदवार विचारणा करत आहे, पण त्यांच्या वडिलांनी हसन मुश्रीफ यांच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळताे, म्हणून ४४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा पराक्रम केला.
डॉ. चेतन नरके म्हणाले, कोल्हापूरच्या रिंगणातून थांबावे लागले, म्हणून नाराज झालो नाही. व्यासपीठावरील उपस्थिती पाहता, भविष्यातील नवी समीकरणे काय असणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
स्वागत इचलकरंजीचे नगरसेवक संतोष शेळके यांनी केले. यावेळी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनीही मनोगत व्यक्त केले. आमदार प्रा. जयंत आसगावकर, बाजार समितीचे सभापती भारत पाटील-भुयेकर, माजी सभापती रंगराव मोळे, संभाजी पाटील-कुडित्रेकर, आपटीचे माजी सरपंच विश्वास पाटील, सत्यशील संदीप नरके आदी उपस्थित होते. आभार चंद्रकांत जाधव यांनी मानले.
आडवा पाय माराल, तर गाठ माझ्याशी
लोकसभेच्या रिंगणातून माघार घेऊन चेतन नरके यांनी काय मिळवले, अशी चर्चा करणाऱ्यांनी आपला गट सांभाळा, आडवा पाय माराल, तर याद राखा गाठ माझ्याशी आहे. मलाही मग ‘कु्ंभी’त लक्ष घालावे लागेल, असा इशाराही चेतन नरके यांनी दिला.