‘कोल्हापूर कस्सं... तुम्ही म्हणशीला तस्सं’; टॅगलाईनखाली काँग्रेस जाहीरनाम्यासाठी मागवणार जनतेतून सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:56 IST2025-12-24T16:55:29+5:302025-12-24T16:56:24+5:30
२९ डिसेंबरला जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार

‘कोल्हापूर कस्सं... तुम्ही म्हणशीला तस्सं’; टॅगलाईनखाली काँग्रेस जाहीरनाम्यासाठी मागवणार जनतेतून सूचना
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रभागनिहाय जाहीरनामा करण्याचा संकल्प केला असून प्रभागात काय हवे, याबाबतच्या सूचना जनतेतून मागवण्यात येणार आहेत. यासाठी ‘कोल्हापूर कस्सं... तुम्ही म्हणशीला तस्सं’ या टॅगलाईनखाली सूचनांसाठी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ खासदार शाहू छत्रपती व काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते मंगळवारी काँग्रेस भवनमध्ये करण्यात आला.
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वतीने शहरातील प्रत्येक प्रभागनिहाय जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्या त्या प्रभागात कोणते उपक्रम, कोणत्या योजना, कोणते प्रकल्प राबवता येतील, यासाठी जनतेमधून सूचना मागवण्यात येतील. जे जनतेच्या मनात आहे त्याच सूचना जाहीरनाम्यात घेण्यात येणार आहेत. सात दिवसांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे.
खासदार शाहू छत्रपती म्हणाले, आपल्या प्रभागात काय हवं आहे हे जनतेकडून जाणून घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
आमदार सतेज पाटील म्हणाले, हा जनतेचा जाहीरनामा असून यामध्ये सर्व प्रभागांमधील जनतेच्या सूचना विचारातून घेऊन २९ डिसेंबरला हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल.
यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, आनंद माने, राजेश लाटकर, बाळासाहेब सरनाईक, दौलत देसाई, भारती पोवार, सरलाताई पाटील, तौफिक मुल्लाणी, माजी उपमहापौर संजय मोहिते, भीमराव पोवार, दुर्वास कदम, राहुल माने, इंद्रजित बोंद्रे, प्रतापसिंह जाधव, अर्जुन माने उपस्थित होते.