लोकसभेचे रणांगण: कोल्हापुरातील नेत्यांच्या चेहऱ्यामागे पडद्याआडचे मोहरे

By विश्वास पाटील | Published: April 25, 2024 12:22 PM2024-04-25T12:22:27+5:302024-04-25T12:25:16+5:30

विश्वास पाटील कोल्हापूर : लोकसभेच्या मागच्या तीन निवडणुकीत नेत्यांची, उमेदवारांची जशी अदलाबदल झाली, त्यांच्या भूमिकाही ३६० कोनात बदलल्या तसेच ...

Jayant Patil, Sunil Modi, Raju Latkar active in Kolhapur Lok Sabha election | लोकसभेचे रणांगण: कोल्हापुरातील नेत्यांच्या चेहऱ्यामागे पडद्याआडचे मोहरे

लोकसभेचे रणांगण: कोल्हापुरातील नेत्यांच्या चेहऱ्यामागे पडद्याआडचे मोहरे

विश्वास पाटील

कोल्हापूर : लोकसभेच्या मागच्या तीन निवडणुकीत नेत्यांची, उमेदवारांची जशी अदलाबदल झाली, त्यांच्या भूमिकाही ३६० कोनात बदलल्या तसेच त्यांच्यासाठी पडद्याआड जोडण्या लावून देण्याचे काम करणाऱ्या मोहऱ्यांचेही झाले आहे. या मोहऱ्यांचे किंवा कारभाऱ्यांचे महत्व या प्रत्येक निवडणुकीत राहिले आहे. आताच्या निवडणुकीत खासदार संजय मंडलिक यांच्यासाठी प्रा. जयंत पाटील, शाहू छत्रपती यांच्यासाठी सुनील मोदी, राजू लाटकर हे काम करत आहेत. सुहास लटोरे हे मात्र तटस्थ आहेत.

निवडणुकीच्या रणधुमाळीत पडद्याआडच्या जोडण्यांना फारच महत्व असते. त्याचे परिणाम निकालात दिसतात. कोणत्या भागात कोण काम करत नाही, कोण जास्त पळत आहे. कोणता समाजघटक नाराज आहे, त्यासाठी काय करायला हवे. कोणत्या नेत्याचे काम कुणाकडे अडकले आहे, त्यासाठी कुणाला फोन करून द्यायला पाहिजे, अशा अनेक बाबी प्रचारावर बारीक नजर ठेवून करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.

ही जबाबदारी त्यांना कुणी दिलेली नसते. ती त्यांनी स्वत:हून स्वीकारलेली असते. ते काय भाडोत्री किंवा सेवा पुरविणारे कार्यकर्ते नव्हेत. नेत्यावरील प्रेमापोटी ते या कामात उमेदवाराइतकेच सक्रिय झालेले असतात. उमेदवार किंवा नेत्यांचाही या कारभारी मंडळीवर मोठा विश्वास असतो. त्यामुळे त्यांच्या शब्दाला मान असतो. ज्या गोष्टी उमेदवारांना सांगायच्या कुणी, असाही जेव्हा कार्यकर्त्यांना प्रश्न पडतो, तेव्हा हे काम या कारभारी मंडळींकडून केले जाते. निवडणुकीतील रोजचे अपडेट उमेदवारांना या मंडळींकडून मिळते.

प्रा. जयंत पाटील : मूळचे सांगली जिल्ह्यातील येळावीचे असलेल्या जयंत पाटील यांची ओळख सर अशी आहे. ते मूळचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे कार्यकर्ते. परंतु, विधानपरिषदेच्या २००८च्या निवडणुकीत त्यांनी थेट महाडिक यांनाच आव्हान दिले. निसटत्या मतांनी त्यांचा पराभव झाला. महापालिकेत जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता आणण्यात प्रा. पाटील यांचा महत्त्वाचा वाटा होता. ते सध्या जनसुराज्य पक्षाचे नेते असले तरी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशीही ते तितकेच एकनिष्ठ आहेत. २००९च्या निवडणुकीत ते संभाजीराजे यांच्याकडे होते. २०१४ व २०१९ला ते धनंजय महाडिक यांच्या प्रचारात होते. आता प्रथमच ते खासदार संजय मंडलिक यांच्यासाठी राबत आहेत. मागच्या तीनपैकी एकदाच त्यांच्या उमेदवारास गुलाल लागला आहे.

सुनील मोदी : सुमारे पाव शतक भाजपचे हार्डकोअर कार्यकर्ते असे काम केलेले सुनील मोदी सध्या महाविकास आघाडीत शाहू छत्रपती यांच्यासाठी जोडण्या लावत आहेत. ते दोनवेळा माजी नगरसेवक होते, परिवहन आणि स्थायी सभापती म्हणूनही त्यांनी काम केले. केएमटी फायद्यात आणण्याचे श्रेय त्यांना जाते. आता ते शेतकरी संघांचे संचालक आहेत. २००९ला ते सदाशिवराव मंडलिक, २०१४ला धनंजय महाडिक, २०१९ला संजय मंडलिक यांच्यासाठी राबले. या तिन्हीवेळा त्यांना गुलाल मिळाला. उध्दवसेनेचे आता ते शहरप्रमुख आहेत.

सुहास लटोरे : माजी आमदार महादेवराव महाडिक गटाचे कारभारी म्हणून ओळख असलेले सुहास लटोरे यांची ओळख अण्णा अशी आहे. ते शिवसेनेचे माजी नगरसेवक होते. या निवडणुकीत ते तटस्थ आहेत. २००९ला ते मंडलिक, त्यानंतर २०१४ व २०१९ला महाडिक यांच्यासाठी सक्रिय होते. त्यांनाही तीनपैकी दोनवेळा गुलालाची संधी मिळाली. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कागलला ते समरजित घाटगे यांच्या सोबत होते.

राजू लाटकर : राष्ट्रसेवा दलाच्या संस्कारातून तयार झालेले राजू लाटकर हे दोनवेळा नगरसेवक होते. स्थायी सभापती होते, त्यांच्या पत्नी ॲड. सुरमंजिरी लाटकर या महापौर होत्या. २००९ला ते मंडलिक यांच्याकडे, २०१४ला महाडिक यांच्यासोबत, २०१९ला पुन्हा संजय मंडलिक यांच्यासोबत, तर आता काँग्रेसचे शाहू छत्रपती यांच्यासाठी सक्रिय आहेत. त्यांना दोनवेळा गुलाल मिळाला. लाटकर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्याशी ते एकनिष्ठ आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात मात्र महाडिक गटाचे समर्थक म्हणूनच झाली.

Web Title: Jayant Patil, Sunil Modi, Raju Latkar active in Kolhapur Lok Sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.