Kolhapur Municipal Election 2026: आयटी पार्कची ५०० कोटींची जागा कोरेंना ३० कोटींना दिली, सतेज पाटील यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:27 IST2026-01-05T12:26:36+5:302026-01-05T12:27:48+5:30
जागा वाचवण्यासाठीच जनसुराज्यचे पॅनेल

Kolhapur Municipal Election 2026: आयटी पार्कची ५०० कोटींची जागा कोरेंना ३० कोटींना दिली, सतेज पाटील यांचा आरोप
कोल्हापूर : कोल्हापुरातील विश्वपंढरीजवळील चार ते पाच एकर जागा आहे. ५०० कोटी रुपयांची ही जागा आमदार विनय कोरे यांना अवघ्या ३० कोटी रुपयांमध्ये दिली आहे. ही जागा वाचवण्यासाठीच जनसुराज्यने महापालिका निवडणुकीत पॅनेल उभे केले आहे, असा आरोप काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी रविवारी केला. महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते. काँग्रेसची मते खाण्यासाठीच जनसुराज्य उभे आहे, असा आरोपही आमदार पाटील यांनी केला.
आमदार पाटील म्हणाले, विश्वपंढरीजवळ चार ते पाच एकर जागेवर अनेकांचा डोळा होता. मी ती जागा कुणालाही द्यायची नाही ही भूमिका घेतली होती. तेथे केशवराव भोसलेसारखे आणखी एखादे नाट्यगृह, मैदान करण्याचा माझा विचार होता. ती जागा सार्वजनिक वापरासाठी राहिली पाहिजे, अशी माझी भूमिका होती. आमचे सरकार होते तोपर्यंत कुणाचे काही चालले नाही. मात्र, सरकार बदलले अन् ताबडतोब ५०० कोटींची जागा आमदार कोरे यांना ३० कोटींमध्ये देऊन टाकली. ही जागा वाचवण्यासाठीच त्यांनी पॅनेल उभे केले आहे.
वाचा : सतेज पाटील ‘फेक नॅरेटिव्ह किंग’, राजेश क्षीरसागर यांची टीका
आयुक्तांना सांगितलं होतं...
या जागेचा निर्णय होत असताना मी आयुक्तांना ही जागा महापालिकेला मागून घ्या, असे सांगितले होते. महापालिकेला जागा कमी पडत आहे. उद्याच्या काळात किमान सात हजार वाहनांचे बहुमजली पार्किंग करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, हे करण्यासाठी जागा नाही. म्हणून ज्या सरकारी जागा आहेत त्या महापालिकेकडे राहिल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे. अशा जागा जे बळकावत आहेत त्या काढून घ्याव्या लागतील, असा इशाराही आमदार पाटील यांनी दिला.