Kolhapur Municipal Election 2026: ..तर ‘इंडिया आघाडी’शी काडीमोड घेऊ, राष्ट्रवादी-शरद पवार गटाने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 14:02 IST2025-12-25T14:00:46+5:302025-12-25T14:02:33+5:30
भाजप, कॉंग्रेस सोडून आघाडीसाठी सर्व पर्याय खुले

Kolhapur Municipal Election 2026: ..तर ‘इंडिया आघाडी’शी काडीमोड घेऊ, राष्ट्रवादी-शरद पवार गटाने दिला इशारा
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी पक्षाला दोन जागा देण्याची तयारी दाखवत केवळ चर्चेत झुलवत ठेवण्याचे काम कॉंग्रेसचे नेते करत आहेत. लोकसभा व विधानसभेला केलेली मदत ते विसरले असून, विधानसभेला ज्यांनी वाटोळे केले त्यांचे ऐकून निर्णय घेणार असतील तर ते खपवून घेणार नाही. कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जपला जात नसेल तर इंडिया आघाडीशी काडीमोड घेऊ, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी बुधवारी केली. भाजप व कॉंग्रेस सोडून आघाडीसाठी सर्व पर्याय खुले असून, जनसुराज्यसह इतर पक्षाचे नेते संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षाचे राष्ट्रीय सचिव, निरीक्षक बाजीराव खाडे म्हणाले, लोकसभा, विधानसभेला कार्यकर्ते लागतात, त्यांच्या निवडणुकीत त्यांना बाजूला करून धनदांडग्यांचा विचार होत असेल तर त्यांनी करायचे काय? आघाडीबाबत दोन दिवसात काही निर्णय झाला नाहीतर वेगळा पर्याय शोधावा लागेल. पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, रियाजी कागदी, पद्मजा तिवले आदींनी मनोगत व्यक्त केले.
वाचा : महायुतीचे आठ, नऊ जागांवर वांदे..; तोडगा काढणार फडणवीस, शिंदे
‘आर. कें.’चा अपमान जिव्हारी!
महापालिकेच्या राजकारणात आर. के. पोवार हे ४० वर्षे सक्रिय आहेत. इंडिया आघाडीमध्ये जागावाटप करताना किमान त्यांच्या प्रभागातील उमेदवार निश्चित करताना विश्वासात घेणे अपेक्षित होते. हा अपमान खूप जिव्हारी लागल्याचे व्ही. बी. पाटील यांनी सांगितले.
‘वन मॅन शो’
विधानसभेला जिल्ह्यातून कॉंग्रेस पक्ष संपला, चांडाळचौकडींचे ऐकून आमचा पक्ष संपवत असाल तर खपवून घेणार नाही. काही मंडळींना कोल्हापूरचे ‘वन मॅन शो’ व्हायचे आहे, असा टोला व्ही. बी. पाटील यांनी लगावला.
आम्ही लढणारच
इच्छुकांनी आघाडीत होणाऱ्या घुसमटीबाबत तिखट शब्दात कॉंग्रेसवर टीका केली. आमदार, खासदार निवडून आणण्यासाठी आमची घरे दिसतात, मात्र नगरसेवक पदासाठी आम्हाला भीक मागायला लावतात, तुम्ही आघाडी करा किंवा नाही, पक्षाच्या चिन्हावर आम्ही लढणार असे दिशा कदम यांच्यासह इच्छुकांनी सांगितले.
राष्ट्रवादीबरोबर बोलणी सुरू; जागा वाटपाचा तिढा सुटेल
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र येण्यासाठी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाबरोबर चर्चा सुरू आहे. जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्याबरोबर माझी चर्चा झाली आहे. त्यांचा प्रस्ताव आम्हाला आला असून आमचाही प्रस्ताव त्यांना दिला आहे. चर्चेनंतर त्यांच्याबरोबरचाही जागावाटपाचा तिढा सुटेल, असा विश्वास काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी व्यक्त केला.
आमदार पाटील म्हणाले, काँग्रेसने नेमलेल्या समितीने राष्ट्रवादीशी चर्चा केली. त्यानंतर पाच ते सहावेळा पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्या आहेत. त्यांच्या जागांचा प्रस्ताव आला असून त्यावर चर्चा सुरू आहे. लवकरच याबाबतच तिढा सुटेल. दरम्यान, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी आज, गुरुवारीही चर्चा करणार आहेत.