Kolhapur Politics: राष्ट्रवादीमध्ये नवे नाराजी नाट्य, इचलकरंजीत चोपडे गटाचा सवता सुभा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 16:19 IST2025-07-19T16:18:14+5:302025-07-19T16:19:11+5:30
परिणामी राष्ट्रवादीचे आणखीन एक स्वतंत्र कार्यालय सुरू होण्याची शक्यता

Kolhapur Politics: राष्ट्रवादीमध्ये नवे नाराजी नाट्य, इचलकरंजीत चोपडे गटाचा सवता सुभा
अतुल आंबी
इचलकरंजी : इचलकरंजीतील राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील पदाधिकारी निवडीवरून चाललेली अंतर्गत धुसफूस संपुष्टात आणण्यासाठी म्हणून राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरून नुकत्याच पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या. परंतु, त्यावरूनही नव्याने नाराजी नाट्य सुरू झाले असून, चोपडे गटाने सवता सुभा मांडण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी राष्ट्रवादीचे आणखीन एक स्वतंत्र कार्यालय सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इचलकरंजीतील राष्ट्रवादी पक्षात सुरुवातीपासूनच अंतर्गत गटबाजीचे ग्रहण लागलेले आहे. राज्यात राष्ट्रवादीचे विभाजन होण्याआधीच इचलकरंजीत मदन कारंडे आणि अशोक जांभळे असे दोन स्वतंत्र गट कार्यरत होते. त्याप्रमाणे राष्ट्रवादीची दोन कार्यालये होती. गणेशोत्सवातही मंडळांना पानसुपारी देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमानीही स्वतंत्रपणे उभारल्या होत्या. त्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार, असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर कारंडे गटातून बाजूला झालेल्या विठ्ठल चोपडे गटाने अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राजाराम मैदानाच्या गाळ्यात अजित पवार गटाचे कार्यालय नव्याने सुरू केले.
या घडामोडीनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात कारंडे व जांभळे हे दोन्ही गट एकत्र आले. त्यांनी जुन्या शिवाजीनगरमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयातून कारभार सुरू केला. विधानसभा निवडणुकीत एकत्रित जोर लावला. परंतु, यश मिळाले नाही. त्यानंतर २७ मार्च २०२५ ला जांभळे गटाने राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करून निवडणूक लढविल्याबद्दल विठ्ठल चोपडे यांना इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आले होते. त्यांच्या फेरनियुक्तीवरून पदाधिकाऱ्यांच्यात अंतर्गत धुसफूस सुरू होती. त्यातच जांभळे गटाने प्रवेश केल्यामुळे त्यांना पद देऊन पक्षात जागा निर्माण करून देण्यासाठी पदाधिकारी निवडी थांबल्या होत्या.
तब्बल आठ महिन्यानंतर गुरुवारी (दि. १७) मुंबईत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यामध्ये इचलकरंजीतील पदाधिकारी निवडी जाहीर केल्या. त्यात विठ्ठल चोपडे यांना प्रदेश सरचिटणीस, बाळासाहेब देशमुख यांना सेवा दलाचे प्रदेश उपाध्यक्ष, तर शहर जिल्हाध्यक्षपदी सुहास जांभळे यांना नियुक्त करण्यात आले. यामध्ये चोपडे आणि देशमुख यांच्यात शहर जिल्हाध्यक्षपदावरून रस्सीखेच झाल्याने दोघांना राज्य पातळीवर बढती देण्यात आली आणि जांभळे गटाला उभारी देण्यासाठी शहर जिल्हाध्यक्षपद देण्यात आले.
परंतु हा निर्णय चोपडे गटाच्या कार्यकर्त्यांना रूचला नाही. शहरात सर्व वातावरण अजित पवार गटाच्या आणि हसन मुश्रीफ यांच्या विरोधात असताना चोपडे गटाने पक्ष प्रवेश करून संपूर्ण यंत्रणा नव्याने उभारली आणि आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या वेळेला पक्षाने राज्य पातळीवर संधी देण्याचे निमित्त करून बोळवण केली, अशी भावना कार्यकर्त्यांत निर्माण झाली आहे. त्यामुळे दिलेल्या पदाला विरोध करत कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहूया, असा निर्णय केला.
कार्यालयाचा नामफलक झाकला
कार्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांनी चोपडे यांना दिलेल्या पदाबद्दल नाराजी व्यक्त करून फक्त सदस्य म्हणून पक्षासोबत राहण्याचा निर्णय घ्या, अशी मागणी केली. त्यानंतर नव्याने स्थापन केलेल्या कार्यालयाच्या नामफलकावर कापड झाकण्यात आले आहे.
सत्तेसाठी पक्ष प्रवेश करणाऱ्यांनी फक्त पक्षात टिकवून ठेवण्यासाठी म्हणून पद दिले जाते. याबद्दल कार्यकर्त्यांत नाराजी असल्याने आम्ही सध्या पक्षासोबत फक्त सदस्य म्हणून राहण्याचा निर्णय घेतला आहे. - विठ्ठल चोपडे
राष्ट्रवादी अजित पवार गटातील सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाचे काम करणार आहे. त्यामध्ये काही नाराजी असेल, तर त्यांची समजूत काढली जाईल. - सुहास जांभळे