Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत निष्ठावंतांचे बंड, भाजप थंड; संभाव्य यादीला स्थगिती दिल्याने पुन्हा वेट अॅण्ड वॉच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 17:27 IST2025-12-27T17:24:46+5:302025-12-27T17:27:49+5:30
गळती लागताच यादी स्थगित, माजी उपनगराध्यक्षाचा शिव-शाहू आघाडीत प्रवेश

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत निष्ठावंतांचे बंड, भाजप थंड; संभाव्य यादीला स्थगिती दिल्याने पुन्हा वेट अॅण्ड वॉच
अतुल आंबी
इचलकरंजी : महानगरपालिका निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या यादीत काही निष्ठावंतांना डावलले गेल्याने त्यांनी बंडाचे हत्यार उपसले, तर काहीजण विरोधी पक्षांसोबत चर्चेत गेले. याबाबतची माहिती यंत्रणेमार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आणि यादीला स्थगिती मिळाली. या घडामोडी घडेपर्यंत आवाडेंचे निकटवर्तीय असलेले माजी उपनगराध्यक्ष महावीर जैन यांनी शिव-शाहू आघाडीत प्रवेश केला. अन्य काहीजण वाटेवर व चर्चेत होते. ते यादीला स्थगिती मिळाल्याने पुन्हा वेट अॅण्ड वॉच करीत आहेत.
आवाडे आणि हाळवणकर यांनी एकत्रित बसून निश्चित केलेल्या नावांवर स्थानिक पातळीवरच एकमत झाले होते. त्यानंतर काही जागांवर वाद होता. त्याबाबत दोघांनीही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत सांगलीत चर्चा केली. परंतु तेथेही एकमत झाले नाही. अखेर त्यांनी मुंबई गाठली. तेथे गुरूवारी (दि.२५) रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, राहुल आवाडे, प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, मकरंद देशपांडे यांची बैठक झाली. त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या सर्व्हेनुसार स्थानिक सर्व्हे याची चाचपणी करून ९० टक्के नावे निश्चित करण्यात आली. त्यानुसार संबंधितांना फोन करून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.
फोन आलेल्या कार्यकर्त्यांनी फटाके लावत स्टेटस् ठेवून उमेदवारी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. परंतु फोन न आलेल्या अन्य इच्छुक उमेदवारांनी बंडाचे हत्यार उपसले. विरोधी पक्षासोबत चर्चा सुरू झाली. काहींनी आपल्या प्रभागापुरते स्वतंत्र पॅनेल उभा करता येईल का, याची चाचपणी सुरू केली. काही निष्ठावंतांना उमेदवारी दिली नसल्याबद्दल भागातील नागरिकांकडून खंत व्यक्त करण्यात आली. या राजकीय उलथापालथीच्या घडामोडींना वेग प्राप्त झाला. शिव-शाहू आघाडीनेही काहींशी संपर्क साधला. त्यातून माजी उपनगराध्यक्ष जैन यांनी शिव-शाहू आघाडीत प्रवेश केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
भाजपला गळती लागत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली. अनेक आयारामांना उमेदवारी देण्यात आली असून, मूळ निष्ठावंतांना डावलले जात असल्याची माहिती यंत्रणेतून मुख्यमंत्र्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी या प्रकारात स्वत: लक्ष घालून स्वत:च्या यंत्रणेमार्फत पुन्हा चाचपणी करणार असल्याचे सांगितले. दोन दिवसांत ते माहिती घेणार आहेत. त्यानंतर नावे निश्चित केली जाणार आहेत.
घडामोडींमुळे पुन्हा यंत्रणा थंडावली
भाजपाची यादी निश्चित झाल्यानंतर त्यातून काही ताकदीचे उमेदवार आपल्या गळाला लागतील, अशी विरोधकांची भावना होती. त्यामुळे त्यांनीही यादी जाहीर केली नव्हती. गुरूवारच्या घोषणेनंतर राजकीय घडामोडींना वेग प्राप्त झाला होता. परंतु स्थगितीमुळे पुन्हा सर्व यंत्रणा थंडावली आहे.
यंत्रणेवर ताण येणार
२३ डिसेंबरपासून ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी मुदत आहे. २६ तारीख उलटली तरी एकही उमेदवार अर्ज दाखल झाला नाही. त्यात भाजपची यादी रविवारी जाहीर होणार असल्याने सोमवार आणि मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होणार असून, निवडणूक यंत्रणेवर ताण येणार आहे.