Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत एबी फॉर्म वाटपाची खिचडी, भाजपने सात जागा रिक्त ठेवल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:39 IST2025-12-31T17:38:41+5:302025-12-31T17:39:21+5:30
महायुतीकडून ६५ जागांसाठी ७८ एबी फॉर्मचे वाटप : माघारीपर्यंत मनधरणीचा खेळ

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत एबी फॉर्म वाटपाची खिचडी, भाजपने सात जागा रिक्त ठेवल्या
अतुल आंबी
इचलकरंजी : इचलकरंजीत महायुतीमध्ये अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म वाटपाचा खेळ सुरू होता. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने तब्बल बारा जणांना एबी फॉर्म दिले आहेत. त्याचबरोबर शिंदेसेनेकडून दहा उमेदवारांना, तर भाजपकडून ५६ उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. असे एकूण ७८ जणांना एबी फॉर्म मिळाले आहेत. त्यामुळे तब्बल १३ जागांवर अधिकचे उमेदवार उभे आहेत. आता माघारीच्या दिवसापर्यंत पुन्हा मनधरणी आणि तडजोडीची खलबते चालणार आहेत. त्यामुळे त्या-त्या ठिकाणचे उमेदवार पुन्हा ‘गॅस’वरच आहेत.
इचलकरंजीत महायुती झाली असली तरी त्यामध्ये अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर्व काही ठरल्याप्रमाणे आलबेल आहे असे दिसत नाही. राष्ट्रवादीला (अजित पवार) दोन जागा मिळाल्या असल्या तरी त्यांनी बारा जणांना पक्षाचे एबी फॉर्म दिले आहे. दोन जागांवर महायुती, तर दहा जागांवर मैत्रीपूर्ण लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शिंदेसेनेला ११ जागा देण्यात आल्या होत्या, त्यांनी दहा जणांनाच उमेदवारी दिल्याचे सांगितले. त्यामध्ये १४ नंबर प्रभागात भाजपचे चार आणि शिंदेसेनेचा एक असे पाच जण उभे आहेत.
भाजपने एकूण ५६ जणांना उमेदवारी दिली आहे. त्यातील अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे त्या-त्या प्रभागांत चारऐवजी महायुतीचे पाच उमेदवार उभारल्याचे चित्र आहे. जेथे दोन्ही-तिन्ही पक्षांकडून उमेदवारी देण्यात आली आहे, तेथील उमेदवार पुन्हा गॅसवर आहेत. त्यांच्यातील काही उमेदवारांना मनधरणी करून माघार घ्यायला लावावी लागेल अथवा मैत्रीपूर्णच्या नावाखाली उभे करून तेथे जो निवडून येईल, तो महायुतीचा अशी भूमिका राबवली जाईल, असे संकेत मिळत आहेत.
नेमके कोण कुठे..?
ज्या ठिकाणी महायुतीकडून एका प्रभागात विविध घटक पक्षांची उमेदवारी दिली आहे, तेथे मतदारही बुचकळ्यात पडले आहेत. आपल्या मतदारसंघात महायुतीतील कोण? शिव-शाहू आघाडीतून कोण? नेमके कोण कोणाच्या विरोधात लढत आहेत, असा संभ्रम निर्माण होत आहे.
महायुतीत अंतर्गत खळबळ
भाजपने एकूण ५६ जागांवर उमेदवारी दिली आहे. फक्त ९ जागा रिक्त सोडल्या आहेत. त्यामध्ये २ राष्ट्रवादीला दिल्यास शिंदेसेनेसाठी सातच जागा शिल्लक राहतात. महायुतीतील जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार भाजप ५४, शिंदेसेना ११ ठरले होते. त्यामुळे भाजपच्या कोट्यातून दोन राष्ट्रवादीला दिले जाणार होते. प्रत्यक्षात भाजपने ५६, शिंदेसेनेने १० आणि राष्ट्रवादीने १२ जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यामुळे महायुतीत खळबळ उडाली आहे.
भाजपने रिक्त ठेवलेल्या जागा
भाजपने महायुतीतील घटक पक्षांसाठी प्रभाग क्रमांक १ अ, २ ड, ३ क, ४ अ, ७ अ आणि क ८ ब आणि ड, १० क अशा सात जागा शिल्लक ठेवल्या आहेत.