थेट पाइपलाइनमध्ये दोष होता तर आठ वर्षात चौकशीला हात कुणी धरला होता, सतेज पाटील यांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 11:57 IST2026-01-06T11:56:29+5:302026-01-06T11:57:53+5:30
मंत्री पाटील, खासदार महाडिक यांची टीकेची भाषणे हे पाणी पिऊनच

थेट पाइपलाइनमध्ये दोष होता तर आठ वर्षात चौकशीला हात कुणी धरला होता, सतेज पाटील यांचे प्रत्युत्तर
कोल्हापूर : निवडणूक आली की विरोधकांना थेट पाइपलाइनमधील दोष दिसतात. जर या योजनेत दोष होते तर आठ वर्षांपासून महायुतीची सत्ता आहे. या काळात या योजनेची चौकशी करायला तुमचे कुणी हात धरले होते का..? असा सवाल काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी येथे उपस्थित केला.
जे आरोप करतात ते मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या घरात गेल्या दोन वर्षांपासून थेट पाइपलाइनचेच पाणी जाते. हे पाणी पिऊनच ते भाषणाला येतात. त्यामुळे आरोप करण्याआधी अभ्यास करा, असा सल्लाही आमदार पाटील यांनी दिला.
थेट पाइपलाइनचे पाणी अन् पैसा बावड्याला गेला, असा आरोप मंत्री पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. या आरोपाला आमदार पाटील यांनी थेट पाइपलाइनचे वास्तव पीपीटीद्वारे मांडत उत्तर दिले.
आमदार पाटील म्हणाले, थेट पाइपलाइनच्या कामात २०१४ ते २०१९ या काळातील ८७७ दिवसांमध्ये विविध कारणांसाठी अडथळे आले. या काळात महायुतीची सत्ता होती. त्यांना जर ही योजना पूर्णत्वास जाऊ द्यायची होती तर हे अडथळे त्यांनी का दूर केले नाहीत. केवळ मला श्रेय मिळू नये म्हणून हा सारा खटाटोप केला गेला. दिवाळीच्या काळात विद्युत यंत्रणा बिघडवून ही योजना बंद पाडण्याचे कारस्थान केले गेले. थेट पाइपलाइनचे पाणी कळंबा आणि कावळा नाक्यावरील टाकीत जाते. मंत्री चंद्रकांत पाटील आणि धनंजय महाडिक गेल्या दोन वर्षांपासून हेच पाणी पितात. १७८ एमएलडी पाणी रोज कुठे जाते याची अधिकाऱ्यांकडून माहिती घ्या, असा सल्लाही आमदार पाटील यांनी दिला.
थेट पाइपलाइनची कागदपत्रे पाटील, क्षीरसागर यांना पाठवणार
थेट पाइपलाइनबाबत आरोप करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील व आमदार राजेश क्षीरसागर यांना या पाइपलाइनबाबतची सर्व कागदपत्रे व्हॉटसअपवर पाठवणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.
चिठ्ठी दिल्यामुळे पाटील तसे बोलले
थेट पाइपलाइनचे पाणी अन् पैसा बावड्याला गेला असे मंत्री चंद्रकांत पाटील बोलणार नाहीत. मागून कुणीतरी चिठ्ठी दिल्यामुळेच ते तसे बोलले असावेत, असा टोलाही आमदार पाटील यांनी लगावला.
ठेकेदाराला पाटील यांनी सांगावे
थेट पाइपलाइनच्या शहरातील पाणी वितरणासाठीच्या अमृत योजनेचा ठेका मिरजेच्या भाजप आमदारपुत्राकडे होता. त्यांना सत्ताधारी लोक जबाबदार का धरत नाहीत. दोन वर्षाच्या मुदतीचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने ठेकेदाराला २४ काेटीचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे हा दंड भरण्यासाठी मंत्री पाटील यांनी ठेकेदाराला सांगावे.
माझ्याकडून विषयाला फुल्लस्टॉप
मला टार्गेट करा, माझ्यावर आरोप करा पण माझ्यासाठी ७ लाख कोल्हापूरकरांना वेठीस धरू नका, असे आवाहन करत सत्ताधाऱ्यांनी आता या विषयावर कितीही आरोप केले तरी मी त्याला उत्तर देणार नाही. माझ्याकडून या विषयाला पूर्णविराम देत असल्याची घोषणाही आमदार पाटील यांनी यावेळी केली.
योजनेवर बंदोबस्त लावा
थेट पाइपलाइन योजनेवर वारंवार काहीतरी बिघाड केला जातो. आतापर्यंत चार गुन्हे याबाबत दाखल केले आहेत. त्यामुळे या योजनेवर मतदान होईपर्यंत पोलिस बंदोबस्त लावा, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.