Kolhapur: पंच्याहत्तर हजार रुपये लाचेची मागणी, इचलकरंजीतील नगर भूमापन अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 18:48 IST2024-12-23T18:47:37+5:302024-12-23T18:48:42+5:30
इचलकरंजी : शहापूर हद्दीतील दोन भूखंड एकत्रित करून देण्यासाठी ७५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नगर भू-मापन अधिकारी दुष्यंत विश्वास ...

Kolhapur: पंच्याहत्तर हजार रुपये लाचेची मागणी, इचलकरंजीतील नगर भूमापन अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात
इचलकरंजी : शहापूर हद्दीतील दोन भूखंड एकत्रित करून देण्यासाठी ७५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नगर भू-मापन अधिकारी दुष्यंत विश्वास कोळी (रा. इचलकरंजी, मूळ जयसिंगपूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, तक्रारदार आणि त्यांचे सहहिस्सेदार यांची शहापूर येथे गट नं. ४५४ सिटी सर्व्हे नं. १९०२१ मध्ये भूखंड क्र. २७, २८, २९ आणि ३० आहेत. त्यापैकी २७, २८ आणि २९, ३० हे भूखंड एकत्रित करून देण्यासाठी तक्रारदार यांनी नगर भू-मापन अधिकारी कार्यालयाकडे जुलै २०२४ मध्ये अर्ज केला होता. काही दिवसांनी या अर्जाबाबत कार्यालयातील कर्मचाऱ्याकडे चौकशी केली असता त्याने ही दोन्ही प्रकरणे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर कार्यालयाकडे पाठवून त्याची प्रत तक्रारदारास दिली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये संबंधित कर्मचाऱ्याने तक्रारदाराला तुमचे अर्ज जिल्हा कार्यालयातील ज्या टेबलावर आहेत, त्याचा पदभार माझ्याकडेच आहे, असे सांगत त्या अर्जावर मंजुरी आणण्यासाठी ३० हजार रुपये लागतील, असे सांगून वरिष्ठांसाठी लाचेची मागणी केली.
त्यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता संबंधित कर्मचाऱ्याने वरिष्ठ नगर भू-मापन अधिकारी दुष्यंत कोळी यांना भेटण्यास सांगितले. तक्रारदार यांनी कोळी यांची भेट घेतली असता त्यांनी वरिष्ठांसाठी तक्रारदाराकडे ७५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने कोळी याला अटक करून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
लाच मागितल्याने कारवाई
या प्रकरणात अधिकाऱ्याने थेट लाचेची रक्कम स्वीकारली नसली तरी पथकाने केलेल्या पडताळणीत लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आली. तसेच पथकाच्या पडताळणीमध्ये अन्य कर्मचारी अथवा वरिष्ठ अधिकारी यांचा सहभाग आढळून आला नसल्याने फक्त दुष्यंत कोळी याच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घराची झडती
नगर भू-मापन अधिकारी दुश्यंत कोळी याच्या अटकेनंतर पथकाने इचलकरंजी व जयसिंगपूर येथे त्याच्या घराची झडती घेतली. त्यामध्ये आक्षेपार्ह काही हाती लागले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.