Kolhapur Crime: चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून, पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 13:17 IST2025-02-07T13:17:16+5:302025-02-07T13:17:35+5:30
घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली

Kolhapur Crime: चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून, पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर
अतुल आंबी
इचलकरंजी : येथील स्वामी मळा परिसरात पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. मनीषा दिलीप धावोत्रे असे तीचे नाव आहे. खून करून पती दिलीप धावोत्रे हा स्वतः शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर होऊन खून केल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात हलवला. चारित्र्याच्या संशयावरून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
स्वामी मळा परिसरामध्ये दिलीप धोवोत्रे हा परिवारासह राहण्यास आहे. तो यंत्रमाग कारखान्यात दिवाणजी म्हणून काम करतो. त्यांना दोन मुले आहेत. मुले आपल्या आजोळी राहतात. गेल्या काही दिवसापासून दिलीप हा आपल्या पत्नीवर संशय घेत होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद होत होता. काही वेळा नातेवाईक येऊन हा वाद मिटवत होते.
काल गुरुवारीही मनीषा व दिलीप यांच्यामध्ये मध्ये मोठा वाद झाला होता. याचाच राग मनात धरून दिलीप याने पत्नी मनीषा ही घरी झोपलेली असताना मध्यरात्रीच्या सुमारास तिच्या मानेवर आणि तोंडावर धारदार शस्त्राने वार केले. यात मनीषा हिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर दिलीप हा पहाटे पाच वाजता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला व मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी पाहणी केली. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.