गगनबावडा, राधानगरीत जोर'धार', कोल्हापूर शहरासह पूर्वेकडील तालुक्यात पाऊस कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 16:24 IST2025-07-31T16:24:17+5:302025-07-31T16:24:50+5:30
उर्वरित जिल्ह्यात उघडझाप : पंचगंगेची पातळी फुटाने झाली कमी

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरू असली तरी गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, भुदरगड तालुक्यात पावसाचा जोर आहे. उर्वरित तालुक्यात तुलनेत कमी पाऊस आहे. नद्यांच्या पातळीत घट होऊ लागली असून, पंचगंगा नदीची पातळी कमी झाली आहे. अद्याप ३८ बंधारे पाण्याखाली असून, या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम व दक्षिणेकडील तालुक्यात बुधवारी दिवसभर अधूनमधून जोरदार पाऊस कोसळला. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ९.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली तरी गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ४१.५ मिलीमीटर पाऊस झाला. तुलनेत कोल्हापूर शहरासह पूर्वेकडील तालुक्यात पाऊस कमी आहे. तरीही मंगळवार पेक्षा पावसाची भूर भूर अधिक दिसत आहे.
धरण क्षेत्रात पाऊस अजूनही दमदार लागत आहे. राधानगरी धरण क्षेत्रात ६९, वारणा २९ तर दुधगंगा धरण क्षेत्रात ४६ मिलीमीटर पाऊस झाला. राधानगरी धरणातून प्रति सेकंद २९२८, वारणातून १३ हजार १९८ तर दूध गंगेतून ५६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी हळूहळू कमी होत आहे. पंचगंगेची पातळी दिवसभरात एक फुटाने कमी झाली असून रात्री आठ वाजता ३२.०९ फुटावर पातळी होती.
दरम्यान, बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात १४ खासगी मालमत्तांची पडझड होऊन ४ लाख ९८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
एसटीचे तीन मार्ग बंद
जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे ३ राज्य तर ८ प्रमुख जिल्हा मार्ग बंद आहेत. त्याचबरोबर एसटीचे शिरढोण ते कुरुंदवाड, जयसिंगपूर ते धरणगुत्ती, जमखंडी ते कुडची हे तीन मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.
दूधगंगा (काळम्मावाडी) धरणातून ६००० क्युसेक्सने विसर्ग
काळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. सांडव्यावरून ४५०० क्युसेक्स व वीजगृहातून १५०० क्युसेक्स असा एकूण ६००० क्युसेक्स पाणीविसर्ग सुरू आहे. परिणामी धरणातील पाणी विसर्गामुळे दूधगंगा नदीपात्रावरील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरणातील पाण्याची पातळी २१.२० टीएमसी म्हणजे ८३.११% टक्के इतका पाणीसाठा आहे. सोळांकुर -पंडेवाडी, सुळंबी सावर्डे (जुना बंथारा), मालवे - तुरंबे, वाळवा -चंद्रे बाचणी -वडकशिवाले यासह काही छोटे बंधारे ही पाण्याखाली गेले आहेत.