Kolhapur: कॉलेज तरुणांना नशेची इंजेक्शन पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, इचलकरंजीत तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 16:45 IST2025-07-14T16:42:59+5:302025-07-14T16:45:02+5:30
दिल्लीतून इंजेक्शनची खरेदी

Kolhapur: कॉलेज तरुणांना नशेची इंजेक्शन पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, इचलकरंजीत तिघांना अटक
इचलकरंजी : दिल्लीतून ऑनलाइन मागवलेल्या नशिल्या इंजेक्शनची महाविद्यालयीन तरुणांना विक्री करणाऱ्या तिघांच्या टोळीचा गावभाग पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी रविवारी (दि. १३) दुपारी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या ५२ बाटल्यांसह दोन लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
संग्राम अशोकराव पाटील (२९, रा. वृंदावन अपार्टमेंट, श्रीपादनगर), सचिन सुनील मांडवकर (२५, रा. यशवंत कॉलनी) आणि अभिषेक गोविंद भिसे (२५, रा. लालनगर, इचलकरंजी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
काही तरुण नशा करण्यासाठी दिल्लीतून ऑनलाइन मागवलेले मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्यामार्फत गावभाग पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रविवारी दुपारी यशवंत कॉलनीत संग्राम याच्या घरासमोर सापळा रचला. घरातून सचिन बाहेर पडताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडे मेफेनटरमाइन सल्फेट औषधाच्या ५ बाटल्या मिळाल्या.
त्यानंतर संग्रामच्या घरात जाऊन शोध घेण्यात आला. त्याच्याकडे १८ बाटल्यांचा साठा मिळाला. त्याचा मित्र सचिन मांडवकर याचाही औषध विक्रीत सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी लालनगर येथील अभिषेक भिसे याच्याकडे इंजेक्शनचा साठा असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संग्राम याच्या मोबाइलवरून अभिषेकला फोन करून इंजेक्शन घेऊन येण्यास सांगितले.
सापळा रचून पकडत त्याच्याकडून ७ बाटल्या जप्त केल्या. त्याच्या घरझडतीत आणखी २२ बाटल्या आणि साठ हजार रुपयांची रोकड मिळाली. तिघांकडून २१ हजार ९६४ रुपये किमतीच्या मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या ५२ बाटल्या, रोख ६० हजार रुपये, तीन मोबाइल, दोन मोटारसायकली असा दोन लाख ३६ हजार ९६४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
ही कारवाई मिशन झिरो ड्रग्जअंतर्गत पोलिस निरीक्षक महेश चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक पूनम माने, गुन्हे अन्वेषण पथकातील अनिल पाटील, सुनील पाटील, फिरोज बेग, अमर शिरढोणे, बाजीराव पोवार, आदित्य दुंडगे, ताहीर शेख, हवा इंगवले यांच्या पथकाने केली.
दिल्लीतून इंजेक्शनची खरेदी
मेपिनटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या बाटल्यांची खरेदी दिल्लीतून करण्यात आली. एका बाटलीची किंमत ४२२ रुपये असून, ५०० ते ६०० रुपयाला एक इंजेक्शनची विक्री केली जाते.
मेडिकल क्षेत्रामध्ये वापर
मेपिनटरमाईन सल्फेट इंजेक्शनचा वापर मेडिकल क्षेत्रामध्ये शस्त्रक्रियेदरम्यान केला जातो. प्रामुख्याने रक्तदाबावर याचा परिणाम होतो. तसेच थकवा घालवणे, क्षमता वाढवणे, यासाठीही याचा वापर केला जातो. मात्र, विद्यार्थी नशेसाठी याचा वापर करतात.
निर्जनस्थळांचा शोध
इंजेक्शन घेणाऱ्यांमध्ये अकरावीपासूनच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इंजेक्शन टोचून घेण्यासाठी हे विद्यार्थी बंद पडलेल्या शाळा, पडक्या इमारती यांचा शोध घेतात आणि तिथे जाऊन इंजेक्शन टोचून घेतात. शाळेच्या आवारात टोचून घेतलेली अनेक इंजेक्शन पडलेली पाहण्यास मिळतात. इंजेक्शन टोचून घेतल्यानंतर २४ तासांपर्यंत ही मुले गुंगीत राहतात.
दोघे विक्रेते, एक ग्राहक
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमधील संग्राम आणि अभिषेक हे दोघे विक्रेते असून सचिन हा ग्राहक आहे. विक्री करणारे दोघेही अनेक वर्षांपासून याच क्षेत्रात असल्याचे समजते. या तिघांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तिघांनाही तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
कॉलेज विद्यार्थ्यांना हे इंजेक्शन विकले जाते. इंजेक्शन विकणाऱ्यांची टोळी असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. - महेश चव्हाण, पोलिस निरीक्षक