Kolhapur Municipal Election Voting 2026: काँग्रेस-भाजपच्या उमेदवारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक
By उद्धव गोडसे | Updated: January 15, 2026 12:08 IST2026-01-15T12:07:34+5:302026-01-15T12:08:26+5:30
उपनगरांमध्ये मतदानाला रांगा ; उच्चभ्रू वस्त्यांमध्ये थंडा प्रतिसाद

Kolhapur Municipal Election Voting 2026: काँग्रेस-भाजपच्या उमेदवारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी उत्साहात आणि चुरशीने मतदानाला सुरुवात झाली असून, सुमारे १५ टक्के मतदान झाले आहे. शहरातील उपनगरांमध्ये अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची गर्दी आहे. याउलट उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मतदानासाठी थंडा प्रतिसाद आहे. मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागत आहेत.
दरम्यानच, प्रभाग क्रमांक पाचमध्ये न्यू पॅलेस येथील एका मतदान केंद्रावर काँग्रेसच्या उमेदवार सरोज सरनाईक आणि भाजपच्या उमेदवार पल्लवी देसाई यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. मतदारांवर ऑब्जेक्शन घेण्यावरून हा वाद झाला. पोलिसांनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकला.
वाचा : इचलकरंजीत दोन तासात ७.८८ टक्के मतदान; डीकेटीई शाळेच्या केंद्रासमोर मोठी गर्दी, पोलिसांनी जमावाला पांगवले
शहरातील रामानंदनगर, जरगनगर, राजेंद्रनगर, सुभाषनगर, जवाहरनगर, विक्रमनगर, टेंबलाईवाडी यासह कसबा बावड्यात अनेक मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा आहेत. वृद्ध मतदारांना मतदान करण्यास विलंब होत असल्याने रांगा वाढत आहेत. उमेदवारांच्या बूथवरही उत्साही वातावरण आहे. मतदान केंद्रांवर अनावश्यक गर्दी वाढू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. पोलिस अधीक्षक योगेश कुमार, शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी शहरातील काही मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.
उपनगरांच्या उलट उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मात्र सकाळच्या टप्प्यात मतदारांची फारशी गर्दी दिसत नाही. सम्राटनगर, सागरमाळ, प्रतिभानगर, रुईकर कॉलनी, रुक्मिणीनगर, ताराबाई पार्क, कारंडे मळा परिसरात मतदारांच्या मोठ्या रांगा दिसत नाहीत. त्यामुळे अगदी पाच-दहा मिनिटांत मतदान करून मतदार बाहेर पडत आहेत. या परिसरात काही ठिकाणी उमेदवारांचे बूथही रिकामे आहेत. मतदारांना मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागत आहेत.