Kolhapur Politics: स्विकृत नगरसेवकपदावरून खडाजंगी; मोदी-देवकुळे यांच्यात वाद उफाळला, सुनील मोदी म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 12:22 IST2026-02-21T12:21:38+5:302026-02-21T12:22:14+5:30
अन् तेच गुलाल लावून आले!

Kolhapur Politics: स्विकृत नगरसेवकपदावरून खडाजंगी; मोदी-देवकुळे यांच्यात वाद उफाळला, सुनील मोदी म्हणाले..
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदावरून उद्धवसेनेचे उत्तर विधानसभा मतदारसंघ प्रमुख विशाल देवकुळे यांनी शुक्रवारी निवडीनंतर माजी शहरप्रमुख सुनील मोदी यांच्या दारात जाऊन जाब विचारला. दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. उद्धवसेना कॉंग्रेसच्या दावणीला बांधला असून, पक्षात राहून कॉंग्रेसचे काम केल्याचा आरोप देवकुळे यांनी केला.
देवकुळे हे प्रभाग क्रमांक १५ मधून महापालिकेसाठी इच्छुक होते. पण, जागा वाटपाच्या तडजोडीमध्ये जागा कॉंग्रेसला गेल्याने त्यांना आघाडीच्या नेत्यांसह तत्कालीन शहरप्रमुख सुनील मोदी यांनी सत्ता आल्यानंतर परिवहन सभापती पदाचा शब्द दिला होता. पण, महापालिकेत सत्ता थोडक्यात हुकल्याने सभापती पद नाही, तर स्वीकृत म्हणून संधी द्या, अशी मागणी देवकुळे यांनी कॉंग्रेस नेत्यांकडे केली होती. पण, कॉंग्रेसने देवकुळे ऐवजी मोदी यांना संधी दिली. शुक्रवारी स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी झाल्यानंतर मोदी गुलाल लावून घरी आले, तोपर्यंत देवकुळे, महेश उत्तुरे यांच्यासह पदाधिकारी मोदी यांच्या दारात आले.
‘मोदी बाहेर या, तुम्ही शिवसैनिकांचा घात केला’, असे जोरजोरात ओरडू लागले. मोदी बाहेर आल्यानंतर देवकुळे यांनी त्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. महापालिका निवडणुकीत मला दिलेल्या शब्दाचे काय झाले?, असे विचारत निष्ठावंताचा घात केला. वाद वाढण्यापूर्वीच देवकुळे यांना शांत केले.
या घटनेनंतर आमदार सतेज पाटील यांनी देवकुळे यांना फोन करून वर्षभर थांबण्याचा सल्ला दिला. पुढच्या वर्षी तुमचा विचार करतो, असे त्यांनी सांगितल्याचे समजते.
अन् तेच गुलाल लावून आले!
शुक्रवारी सकाळी स्वीकृतबाबत लागणारी सगळी कागदपत्रे गोळा करून ठेव, असा निरोप सुनील मोदी यांनी दिला. ‘तुमचे नाव घेतो, म्हणून मोदी सभागृहात गेले आणि तेच गुलाल’ लावून आल्याचे देवकुळे यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीत मला थांबवून शब्द दिला, त्याची पूर्तता करायला हवी होती. पण, सुनील मोदी यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी उद्धवसेनेला कॉंग्रेसच्या दावणीला बांधून निष्ठावंत शिवसैनिकांचा घात केला. याबाबत, आज शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्षनेतृत्वाकडे जाणार आहोत. - विशाल देवकुळे
आमदार सतेज पाटील यांनी उद्धवसेनेला म्हणून मला पद दिले. इतरांनी अपेक्षा करणे चुकीचे नाही, विशाल देवकुळे यांची समजूत काढली असून, त्या विषयावर पडदा पडला आहे. - सुनील मोदी