Kolhapur Municipal Election 2026: महायुतीचे आठ, नऊ जागांवर वांदे..; तोडगा काढणार फडणवीस, शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 14:12 IST2025-12-25T14:09:48+5:302025-12-25T14:12:28+5:30
पुण्यातील हॉटेलवर साडेपाच तास मॅरेथॉन बैठक, चंद्रकांत पाटील, महाडिक बंधू, क्षीरसागर यांची उपस्थिती

Kolhapur Municipal Election 2026: महायुतीचे आठ, नऊ जागांवर वांदे..; तोडगा काढणार फडणवीस, शिंदे
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी पुण्यातील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बुधवारी तब्बल साडेपाच तास मॅरेथॉन बैठक चालली. अजूनही आठ, नऊ जागांवर महायुतीमध्ये फैसला झालेला नसून याचा निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत.
या बैठकीमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर आणि प्रा. जयंत पाटील यांच्यात उमेदवारनिहाय चर्चेचा कीस पडला. ८१ पैकी ७० हून अधिक जागांवर भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांच्यात एकमत झाले असून उर्वरित जागांसाठीचा तोडगा वरिष्ठ पातळीवर काढण्यात येणार आहे. त्यासाठी आज, गुरुवारीही मुंबई बैठका होणार आहेत.
वाचा- कोल्हापूर महापालिकेत जागावाटपात काँग्रेस-उद्धवसेनेत एकमत झालं, आप, मनसे, राष्ट्रवादीबाबत सतेज पाटील म्हणाले...
मंगळवारी येथे महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाल्यानंतर लगेचच त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी बुधवारी पुण्यात बैठक घेण्यात आली. चंद्रकांत पाटील हे पुणे, पिंपरी-चिंचवडच्या निवडणुकीत अडकल्याने पुण्यातही ही बैठक घेण्याचा निर्णय झाला. दुपारी १२ ला सुरू झालेली ही बैठक साडेपाच तास चालली. या ठिकाणी प्रभाग निहाय, पक्षनिहाय, उमेदवारनिहाय चर्चा करण्यात आली.
कुणाला उमेदवारी दिली तर काय होईल, कोण सरस आहे कोण नीरस आहे या सगळ्यांबाबत उघडपणे यावेळी चर्चा झाली. परंतु तरीही आठ ते नऊ जागांबाबत एकमत झालेले नाही. एकमत होईल तितका विषय संपवून नेते उठले आणि उर्वरित विषय हा वरिष्ठांच्यावर सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.
चंद्रकांत पाटील, मुश्रीफ यांच्यात फोनवरून चर्चा
या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित नव्हते. परंतु मंत्री पाटील यांनी मुश्रीफ यांच्याशी फोनवरून चर्चा करून राष्ट्रवादी अजित पवार पक्षासाठी कोणत्या जागा सोडल्या आहेत त्याची माहिती दिली तसेच मुश्रीफ यांनी इतर विचारलेल्या माहितीचीही देवाणघेवाण झाल्याचे सांगण्यात आले.
धनंजय महाडिक मुंबईला रवाना
पुण्यातील बैठक आवरून खासदार महाडिक हे बुधवारी रात्रीच मुंबईला रवाना झाले. आज, गुरुवारी ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नियोजनाप्रमाणे ठरलेल्या उमेदवारांच्या याद्या सादर करणार आहेत. ज्या ठिकाणी एकमत झालेले नाही त्याचीही माहिती या वरिष्ठांना देण्यात येणार आहे.
शिंदे यांच्याकडे यादी देणार
पुण्यातील या बैठकीत ज्या नावांवर एकमत झाले ती यादी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहोच करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी एकमत झालेले नाही त्याचीही माहिती देऊन शिंदेसेना कुठल्या जागांसाठी आणि का आग्रही आहे याचीही माहिती शिंदे यांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.