Kolhapur Municipal Election 2026: काँग्रेसचे आणखी १४ उमेदवार जाहीर, महायुतीमध्ये अजूनही पेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 11:54 IST2025-12-29T11:52:55+5:302025-12-29T11:54:56+5:30
महायुतीमधील काही जागांचा तिढा अजूनही सुटला नाही

Kolhapur Municipal Election 2026: काँग्रेसचे आणखी १४ उमेदवार जाहीर, महायुतीमध्ये अजूनही पेच
कोल्हापूर : एकीकडे महायुतीमधील काही जागांचा तिढा अजूनही सुटला नसताना दुसरीकडे काँग्रेसने १४ उमेदवारांची दुसरी यादी रविवारी रात्री उशिरा जाहीर केली. महायुतीच्या जरी दिवसभर मॅरेथॉन बैठका झाल्या असल्या तरीही त्यांना अंतिम निर्णय घेता आलेला नाही. त्यामुळे आता यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हस्तक्षेप करावा लागणार आहे.
महायुतीच्या उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये जनसुराज्यला फारशी संधी मिळणार नाही असे चित्र रविवारी होते. दुसरीकडे मातोश्रीवरून आदेश आल्यानुसार उद्धवसेनेने काँग्रेससोबत सात जागा लढवण्याचा निर्णय मान्य केला असून, शहर प्रमुख सुनील मोदी यांनीही पक्षादेश मानून निवडणूक रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे, तर उद्धवसेनेचे प्रमुख पदाधिकारी शशिकांत बिडकर यांनी पक्षाला रामराम ठोकला असून ते राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत जाणार आहेत. दरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोमवारी आपली भूमिका जाहीर करणार आहे.
वाचा : महायुतीमध्ये चार जागांवरून वाद; फडणवीस, शिंदे घेणार निर्णय
आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित करण्यात काँग्रेसने आघाडी घेतली आहे, तर त्यांच्याशी मतभेद झाल्याने राष्ट्रवादी (शरद पवार), वंचित बहुजन आघाडी आणि आप यांची युती झाली आहे. उद्या सर्व आघाडी, युतीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर अनेकजण अपक्ष अर्ज दाखल करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत बहुतांश माजी नगरसेवक व त्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. माजी नगरसेवक डॉ. संदीप नेजदार यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. माजी महापौर स्वाती यवलुजे, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, पद्मावती काकासाहेब पाटील, माजी नगरसेवक अजित पोवार यांच्या पत्नी रुपाली पोवार, माजी नगरसेवक हरिश चौगले यांचे चिरंजीव सचिन चौगले शिवाजी कवाळे यांचे चिरंजीव रोहित कवाळे, ॲड. नीलेश नरुटे यांच्या पत्नी ॲड. पुष्पा नरुटे, सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटीचे विनायक कारंडे, सरोज सरनाईक यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.
महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वी काँग्रेस पक्षाने दोन टप्प्यात उमेदवारांची घोषणा करून तिकीट वाटपात आघाडी घेतली आहे. काँग्रेसने आतापर्यंत ६१ उमेदवार दिले असून मनसेच्या एका उमेदवारास पुरस्कृत केले आहे. उमेदवारी जाहीर झालेले सर्व उमेदवार आज, सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
प्रभाग क्र. /आरक्षण / उमेदवाराचे नाव
१. अनुसूचित जाती / सुभाष राजाराम बुचडे
१. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला/ पुष्पा नीलेश नरुटे
१. सर्वसाधारण महिला/ रुपाली अजित पोवार (धामोडकर)
१. सर्वसाधारण/ सचिन हरिष चौगले
५. नागरिकांचा मागास प्रवर्ग/ विनायक कृष्णराव कारंडे
४. सर्वसाधारण महिला /सरोज संदीप सरनाईक
४. सर्वसाधारण महिला/ स्वाती सागर यवलुजे
९. नागरिकांचा मागास प्रवर्ग / नंदकुमार किरण पिसे
११. सर्वसाधारण / संदीप सुभाष सरनाईक
१३. सर्वसाधारण / दीपक बबनराव थोरात
१५. अनुसूचित जाती /रोहित शिवाजीराव कवाळे
१६. सर्वसाधारण महिला/ धनश्री महेश कोरवी
१६. सर्वसाधारण महिला/ पद्मावती काकासाहेब पाटील
१७. नागरिकांचा मागास प्रवर्ग / सचिन मारुती शेंडे